खंडेराजुरीत कामगार-भाजप समर्थकांत वादावादी; दगडफेक, मारहाण केल्याचा कामगारांचा आरोप
By अविनाश कोळी | Published: December 3, 2023 09:01 PM2023-12-03T21:01:33+5:302023-12-03T21:01:40+5:30
याबाबत त्यांनी पोलिसांत तक्रार केली नाही.
मिरज : खंडेराजुरी (ता. मिरज) येथे पालकमंत्र्यांच्या विरोधात पत्रक वाटण्यास गेलेल्या कामगारांना भाजप समर्थकांनी रोखल्याने दोन गटांत वादावादी झाली. पालकमंत्र्यांच्या विरोधात पत्रक वाटणाऱ्या कामगारांची अडवलेली बस पोलिसांनी सोडविली. भाजप समर्थकांनी दगडफेक व मारहाण केल्याचा आरोप कामगारांनी केला. मात्र याबाबत त्यांनी पोलिसांत तक्रार केली नाही.
पुणे येथील जनरल मोटर्स कंपनीस टाळेबंदीस परवानगी दिल्याच्या कारणावरून कंपनीच्या कामगारांनी मिरज तालुक्यात पालकमंत्र्याच्या विरोधात आंदोलन सुरू केले होते. रविवारी सकाळी खंडेराजुरी येथे जाऊन कामगारांनी गावात पालकमंत्र्यांच्या विरोधात पत्रके वाटण्यास सुरुवात केली. भाजप समर्थकांनी या कामगारांना अडवत राष्ट्रवादी कार्यकर्त्यांसोबत का आलात? असा जाब विचारला. यावेळी दोन्ही गटांत वादावादी होऊन कामगारांची बस काही वेळ रोखण्यात आली. पोलिसांनी मध्यस्ती करीत कामगारांची सुटका केली. यावेळी तेथून निघून गेलेले राष्ट्रवादीचे कार्यकर्ते विज्ञान माने यांचा पाठलागही करण्यात आला. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी दगडफेक करून मारहाण केल्याचा आरोप कामगारांनी केला. याबाबत तक्रार देण्यासाठी कामगार मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात गेले. मात्र दोन्ही गटांनी कोणतीही तक्रार दिली नसल्याचे पोलिस निरीक्षक नारायण देशमुख यांनी सांगितले.
पालकमंत्र्यांच्या विरोधात पत्रक वाटून चुकीची माहिती पसरवत असल्याने कामगारांना अडवले. यावेळी राष्ट्रवादीचे विज्ञान माने पळून गेल्याने आम्ही बस अडवली. आम्ही दगडफेक केलेली नाही, पळून गेलेल्या विज्ञान मानेना परत बोलवा, असे आम्ही कामगारांना सांगितले. मात्र पोलिसांनी मध्यस्थी केल्याने बस सोडून देऊन आम्ही पोलिस ठाण्यात गेलो, असे भाजप समर्थक किशोर कांबळे यांनी सांगितले. या घटनेनंतर कामगारांनी आंदोलन गुंडाळले.