विद्यार्थिनीला शाळेची फरशी पुसण्यास लावल्याने वादंग, मुख्याध्यापिकेला बजावली नोटीस; सांगलीतील प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2023 06:41 PM2023-06-21T18:41:26+5:302023-06-21T18:41:43+5:30
प्रशासन अधिकारी शेंडगे यांनी शाळेत जाऊन माहिती संपूर्ण प्रकारची माहिती घेतली
सांगली : महापालिकेच्या शाळेमध्ये एका विद्यार्थिनीला फरशी पुसायला लावण्याची चर्चा समाजमाध्यमात होती. त्याची दखल घेत शिक्षण मंडळाने संबंधित मुख्याध्यापिकेला नोटीस बजावली आहे.
शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकारी गीता शेंडगे यांनी असा कोणताही प्रकार शाळेत घडलेला नाही. सांडलेल्या पाण्यामुळे कुणी घसरून पडू नये, यासाठी विद्यार्थिनीने फरशीवर सांडलेले पाणी मॉबने पुसले आहे. तरीही संबंधित मुख्याध्यापिकेला नोटीस बजावून खुलासा मागविला असल्याचे स्पष्ट केले. महापालिकेची सभा सुरू असतानाच शाळा क्रमांक १ मध्ये विद्यार्थिनीला फरशी पुसायला लावल्याचे वृत्त समाजमाध्यमांवर प्रसिद्ध झाले.
महासभा सुरू असताना प्रशासन अधिकारी शेंडगे यांनी शाळेत जाऊन माहिती संपूर्ण प्रकारची माहिती घेतली. असा कोणताही प्रकार घडलेला नाही. विद्यार्थी किंवा विद्यार्थिनीला फरशी पुसणे, स्वच्छतेचे काम लावले जात नाही. स्वच्छतेसाठी स्वतंत्र महिला नेमण्यात आली आहे.
संबंधित विद्यार्थिनीच्या हातातील बाटली खाली पडली. त्यातील पाणी फरशीवर सांडले. त्यावेळी शाळेचे शिक्षक वर्गात अध्यापनाचे काम करीत होते. सांडलेल्या पाण्यामुळे कोणी घसरून पडू नये, या उद्देशाने ती विद्यार्थिनी स्वतःहून मॉब घेऊन सांडलेले पाणी पुसत असताना कोणीतरी तिचा फोटो काढल्याचे शेंडगे यांनी सांगितले.