सांगलीतील कुरळपमध्ये पालखीच्या मानावरून राडा, पोलिस बंदोबस्तात पालखी मिरवणूक
By हणमंत पाटील | Published: October 25, 2023 06:48 PM2023-10-25T18:48:15+5:302023-10-25T18:49:24+5:30
सोने लुटण्याची परंपरा पहिल्यांदा खंडित
दिलीप मोहिते
कुरळप : कुरळप (ता. वाळवा) येथील हनुमान मंदिरात दसऱ्याच्या सीमोल्लंघनावेळी पालखी मिरवणुकीच्या मानपानावरून ग्रामपंचायतीच्या सत्ताधारी व विरोधी गटातील कार्यकर्त्यांमध्ये जोरदार वादावादी व हाणामारी झाली. दोन्ही गटांमध्ये समझोता न झाल्याने दुपारची पालखी केवळ खांदेकऱ्यांच्या उपस्थितीत पोलिस बंदोबस्तात रात्री निघाली. यंदा पोलिस ठाण्यात सोने लुटण्याची अनेक वर्षांची परंपराही खंडित झाली.
गेली चाळीस ते पन्नास वर्षांपासून विजयादशमी दसऱ्यानिमित्त बिरोबा व हनुमान देवाची पालखी ढोल- ताशाच्या गजरात निघते. पोलिस ठाण्यात आपट्याच्या पानाच्या ढिगाचे पी.आर. पाटील यांच्या हस्ते पूजन होताच गावकरी सोने लुटत अशी परंपरा होती.
ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप जिल्हा उपाध्यक्ष अशोक पाटील यांच्या नेतृत्वाखाली युवक क्रांती पॅनलची सत्ता आली आहे. मंगळवारी दुपारच्या सुमारास अशोक पाटील आणि कार्यकर्ते हनुमान मंदिरात आले. तत्पूर्वी राज्य साखर संघाचे अध्यक्ष पी.आर. पाटील व कार्यकर्ते मंदिरात होते. यावेळी पी.आर. पाटील यांनी दसऱ्याच्या पालखीचा मान पूर्वीपासून असल्याचे सांगितले. तेव्हा मागील ३८ वर्षात आम्ही कधीच मान मागितला नाही, आमची सत्ता असल्याने आम्ही पालखी नेणार, असे अशोक पाटील व कार्यकर्त्यांनी सांगितले. त्यानंतर दोन्ही गटात वाद सुरू झाली.
पालखीच्या मानावरून दोन्ही गटात वाद..
पालखीच्या मानावरून दोन्ही गटांत वाद सुरू झाला. वादाचे पर्यावसान हाणामारीत झाले. दोन्ही कार्यकर्ते एकमेकांवर तुटून पडले. गावातील ज्येष्ठ मंडळींनी दोन्ही गटांना समजावण्याचा प्रयत्न केला; परंतु, कोणीही ऐकण्याच्या स्थितीत नव्हते. अखेर कुरळप पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक गणेश वाघमोडे यांच्या मध्यस्थी केली. बराचवेळ तोडगा निघाला नाही. तेव्हा फक्त मानाच्या खांदेकऱ्यांनीच पालखी गावातून फिरवून सीमोल्लंघन करावे, अन्यथा पालखी मंदिरात ठेवण्यात येईल, अशी अट घातली. अखेर खांदेकऱ्यांनी पोलिस बंदोबस्तात पालखी सोहळा पार पाडला. एकाही नागरिकाला पालखीच्या आसपास पोलिसांनी फिरकू दिले नाही. ग्रामस्थांची निराशा झाली. गांभीर्य ओळखून पोलिसांची जादा कुमक मागवली होती.
पोलिसांनी वाटली आपट्याची पाने
कुरळपच्या इतिहासातील पहिल्यांदाच असा प्रकार घडला. पोलिसांनी काढलेल्या तोडग्याने पालखी सोहळा रद्द होण्याची नामुष्की टळली. सहायक निरीक्षक वाघमोडे यांनी श्रीफळ वाढवून स्वागत केले. नागरिकांना पोलिसांनी आपट्याची पाने वाटली. परिसराला पोलिस छावणीचे स्वरूप आले होते.