दोषारोपपत्रातील बदलासाठी उज्वल निकम यांचा युक्तीवाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2017 11:18 AM2017-10-11T11:18:13+5:302017-10-11T11:30:46+5:30
बहिणीच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी तिच्या पळशी (ता. खानापूर) येथील सासरकडील तीन महिलांचा गळा चिरुन झालेल्या खून खटल्यात दोषारोपपत्रात बदल करण्यासाठी विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी मंगळवारी युक्तीवाद केला. पुढील सुनावणी २४ आॅक्टोंबरला असून, यादिवशी बचाव पक्षाचे वकील प्रमोद सुतार यांचा युक्तीवाद होणार आहे.
सांगली : बहिणीच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी तिच्या पळशी (ता. खानापूर) येथील सासरकडील तीन महिलांचा गळा चिरुन झालेल्या खून खटल्यात दोषारोपपत्रात बदल करण्यासाठी विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी मंगळवारी युक्तीवाद केला. पुढील सुनावणी २४ आॅक्टोंबरला असून, यादिवशी बचाव पक्षाचे वकील प्रमोद सुतार यांचा युक्तीवाद होणार आहे.
सुधीर सदाशिव घोरपडे, रवींद्र रामचंद्र कदम (रा. भूड, ता. खानापूर) व एक अल्पवयीन अशा तिघांविरुद्ध तीन महिलांचा खून केल्याचा आरोप आहे. संशयित सुधीर घोरपडे याची बहिण विद्याराणी हिचा विवाह पळशीतील बाळासाहेब शिंदे यांचा मुलगा बळवंतशी झाला होता. कौटूंबिक कलहातून २००९ मध्ये विद्याराणीने आत्महत्या केली होती. तिला आत्महत्येस सासरे बाळासाहेब शिंदे व घरातील अन्य लोकांनी प्रवृत्त केल्याचा संशय सुधीरला होता.
या घटनेपासून तो शिंदे कुटूंबावर चिडून होता. यातून त्याने मित्रांच्या मदतीने २१ जून २०१५ रोजी पळशीतील शिंदे वस्तीवर जाऊन ब्रम्हदेव शिंदे यांची आई प्रभावती शिंदे, बहिन सुनीता संजय पाटील व पत्नी निशीगंधा शिंदे यांच्या चाकूने गळा चिरुन खून केला होता.
गेल्या महिन्यापासून जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. बी. काकतकर यांच्या न्यायालयात या तिहेरी खून खटल्याची सुनावणी सुरु झाली आहे. सरकार पक्षातर्फे या खटल्यात विशेष सरकारी वकील उज्वल निकम या खटल्याचे काम पाहत आहेत.
बचाव पक्षातर्फे सांगलीतील अॅड. प्रमोद सुतार काम पाहत आहेत. गत सुनावणीला अॅड. निकम यांनी दोषारोपपत्रामध्ये बदल करणार असल्याने सांगून तसा अर्जही सादर केला. त्यावर मंगळवारी १० आॅक्टोंबरला न्यायालयाने सुनावणी सुरु ठेवली.
कट रचून खून
अॅड. निकम यांनी दोषारोपपत्रात बदलासाठी मंगळवारी युक्तीवाद केला. यामध्ये त्यांनी संशयितांनी कट रचून खून केला आहे, हे कलम वाढविण्यात यावे, अशी मागणी केली. दहा मिनीटे त्यांचा युक्तीवाद झाला. आता पुढील सुनावणी २४ आॅक्टोंबरला आहे. यादिवशी बचाव पक्षाचे वकील प्रमोद सुतार युक्तीवाद करणार आहेत. त्यानंतर न्यायालय दोषारोपपत्रात बदल करण्याबाबत निर्णय देणार आहे.