विरोधी उमेदवारांवरच ठरणार बेरीज-वजाबाकीचे गणित-इचलकरंजी वार्तापत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2019 11:48 PM2019-03-12T23:48:09+5:302019-03-12T23:48:41+5:30
इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्राबल्य असले तरी इचलकरंजी शहरात मात्र कॉँग्रेस-राष्टÑवादीच्या पाठिंब्यावर मिळणाऱ्या मतावरच खासदार राजू शेट्टी
अतुल आंबी ।
इचलकरंजी : इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्राबल्य असले तरी इचलकरंजी शहरात मात्र कॉँग्रेस-राष्टÑवादीच्या पाठिंब्यावर मिळणाऱ्या मतावरच खासदार राजू शेट्टी यांना समाधान मानावे लागणार आहे. त्याचबरोबर विरोधी उमेदवार कोण असणार यावरही काही प्रमाणात मतांची बेरीज-वजाबाकी होणार आहे.
इचलकरंजी मतदारसंघात माने गटाचे स्वतंत्र अस्तित्व आहे; परंतु माजी खासदार निवेदिता माने यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याने गटातील प्रमुख मंडळी स्वतंत्र वाटचाल करीत भाजप व राष्टÑवादीमध्ये सामील झाले आहेत. माने घराण्यातील उमेदवार उभारल्यास ते एकत्रित येऊन धैर्यशील माने यांना सर्वतोपरी सहकार्य करतील, असे चित्र सध्या तरी आहे. या उलट सदाभाऊ खोत यांना उमेदवारी मिळाल्यास माने गट एकसंधपणे न राहता स्वतंत्र पद्धतीने प्रचारात सहभागी होऊ शकतो. एकूण मतदारसंख्येत इचलकरंजी शहरात दोन लाख २० हजार मतदार आहेत. ग्रामीण भागातील पाच गावांचे मिळून ७१ हजार मतदान आहे. शहरातील मताधिक्य महत्त्वाचेच राहते. इचलकरंजी शहरात ‘स्वाभिमानी’चे संघटन नसले तरी चळवळीतील नेता ही प्रतिमा हेच शेट्टी यांचे आजपर्यंतचे भांडवल राहिले आहे.
इचलकरंजी शहरातील पाणीप्रश्नावर तोडगा काढण्यासाठी शिरोळ तालुक्यातील दानोळी येथून वारणा नदीचे पाणी आणण्यासाठी भाजपचे या मतदारसंघातील आमदार सुरेश हाळवणकर यांनी शासनदरबारी प्रयत्न करून योजना मंजूर केली. गत निवडणुकीतील विरोधी उमेदवार असलेल्या आवाडे घराण्याबरोबर शेट्टी यांचा चांगला घरोबा निर्माण झाला आहे. त्यामुळे कॉँग्रेसबरोबर ‘स्वाभिमानी’ची आघाडी झाली अथवा नाही झाली तरी आवाडे गट या निवडणुकीत शेट्टी यांच्यासोबत राहणार हे स्पष्टच आहे. जिल्हा परिषदेच्या राजकारणातही हे दोन्ही गट सध्या एकत्र आहेत. विरोधी शिवसेनेचे संभाव्य उमेदवार धैर्यशील माने हे आवाडे यांचे पारंपरिक राजकीय विरोधक आहेत. त्यामुळे इचलकरंजीत शेट्टी यांना आवाडे गटाची मोठी रसद मिळू शकते. हे सर्व शेट्टी आघाडीत असेल तरच शक्य होणार आहे.
कोण कोणाबरोबर असेल
खासदार राजू शेट्टी : आवाडे गट, कारंडे गट, शेतकरी संघटना.
धैर्यशील माने : आमदार सुरेश हाळवणकर, माने गट.
सध्याचे मतदान :
२ लाख ९१ हजार ३२७.
पुरुष - १ लाख ५१ हजार ६२०
स्त्री - १ लाख ३९ हजार ६५१
इतर- ५६.
गत निवडणुकीत मिळालेली मते :
राजू शेट्टी : ९७,६९१
कल्लाप्पाण्णा आवाडे : ७७,८७९
मताधिक्य : १९ हजार ८१२.