कारंदवाडीत सशस्त्र हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2017 12:49 AM2017-12-11T00:49:21+5:302017-12-11T00:49:59+5:30
आष्टा : कारंदवाडी (ता. वाळवा) येथे हॉटेलची उधारी देण्यावरून दोन गटात तलवार, कोयता, सत्तूर अशा धारदार शस्त्रांनी जीवघेणा हल्ला झाला. यामध्ये दोन महिलांसह सहाजण गंभीर जखमी झाले आहेत. आष्टा पोलिसात हिम्मत पाटील, किरण पाटील, उदय पाटील, बंडा उत्तरे यांच्यासह सतराजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवारी सकाळी ११ वाजता ही घटना घडली. या प्रकारानंतर गावात तणावपूर्ण वातावरण असून पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.
कारंदवाडी (ता. वाळवा) येथील पेट्रोल पंपाजवळ मनोज वग्याणी यांचे हॉटेल एम. व्ही आहे. या हॉटेलमधील उधारीवरून बंडा उत्तरे व हॉटेल मालक मनोज वग्याणी यांच्यात काही दिवसांपूर्वी वाद झाला होता. यातून महिन्याभरापूर्वी किरकोळ मारामारीही झाली होती. हा वाद गावातील ज्येष्ठ नागरिकांनी मिटवला होता. रविवारी पुन्हा पूर्वीच्या भांडणातून पाटील गटाच्या दहा ते पंधरा तरुणांनी वग्याणी यांची बाजू घेऊन भांडणात मध्यस्थी करणाºया सुमित वाडकर याच्या घरात शिरून त्याच्यावर तलवारीने हल्ला केला. यात तो गंभीर जखमी झाला. त्याचे वडील राजेंद्र वाडकर यांनाही मारहाण करण्यात आली. त्यानंतर मध्यस्थी करणाºया प्रतीक पाटील याच्यावरही संशयितांनी पेट्रोल पंपाजवळ हल्ला केला. यात त्याचे हात व पाय मोडले. प्रतीकची आई सुनंदा यांनाही मारहाण केली. त्यानंतर हल्लेखोरांनी हॉटेल मालक मनोज वग्याणी व त्यांची आई पद्मजा वग्याणी यांच्यावरही शस्त्राने हल्ला केला. यात मनोज गंभीर जखमी झाला आहे. जखमींवर आष्टा ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.
या हल्ल्या प्रकरणी १७ जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आष्टा पोलिस ठाण्यात उपविभागीय पोलिस अधिकारी किशोर काळे, पोलिस निरीक्षक मिलिंद पाटील रात्री उशिरापर्यंत तळ ठोकून होते. या हल्ला प्रकरणामुळे कारंदवाडी परिसरात खळबळ उडाली असून अफवा पसरत आहेत. गावात तणावपूर्ण वातावरण आहे.