Sangli: केरेवाडी, आरेवाडीत सशस्त्र दरोडा; पोलिसांवर दगडफेक, हवेत गोळीबार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2024 04:49 PM2024-07-29T16:49:46+5:302024-07-29T16:49:46+5:30

हल्ल्यात महिला जखमी

Armed robbery in Kerewadi, Arewadi sangli district; Stone pelting on police | Sangli: केरेवाडी, आरेवाडीत सशस्त्र दरोडा; पोलिसांवर दगडफेक, हवेत गोळीबार

Sangli: केरेवाडी, आरेवाडीत सशस्त्र दरोडा; पोलिसांवर दगडफेक, हवेत गोळीबार

कवठेमहांकाळ : कवठेमहांकाळ तालुक्यातील आरेवाडी व केरेवाडी येथील तीन ठिकाणी पाच ते सहा दोरडखोरांनी दशहत माजवत सशस्त्र दरोडा टाकला. मारहाण करत दरोडखोरांनी सुमारे ३लाख ४६ हजाराचा रोख रकमेसह मुद्देमाल लूटला. हल्ल्यात हिराबाई दत्तू कोळेकर (रा. आरेवाडी) ही महिला जखमी झाली. शनिवारी मध्यरात्रीनंतर हा प्रकार घडला.

दरोड्याची माहिती मिळताच पोलिस तत्काळ धावले. परंतु त्यांच्यावर दगडफेक केल्याचा प्रकार घडला. पोलिसांनी हवेत गोळीबार केला. सात ते आठ तासांच्या मोहिमेनंतर पोलिसांनी एका संशयितास ताब्यात घेतले आहे. त्यांची चौकशी सुरू आहे. दिगंबर रावसाहेब करे (रा. केरेवाडी) यांनी कवठेमहांकाळ पोलिसात फिर्याद दिली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, आरेवाडी येथील विजय शंकर बाबर, हिराबाई दत्तू कोळेकर व केरेवाडी येथील दिगंबर रावसाहेब करे यांच्या घरामध्ये शनिवारी मध्यरात्रीनंतर अज्ञात ५ ते ६ दरोडेखोर काठी, कुऱ्हाड, चाकू अशी हत्यारे घेऊन घरात घुसले. कुटुंबातील मुलासह सर्वांना काठीने मारहाण करत चाकूचा धाक दाखवून दहशत माजवली. दरोडेखोरांनी करे यांच्या घरातून १ लाख ३५ हजार रुपये रोख रकमेसह सोन्या-चांदीचे दागिने लूटले. बाबर यांच्या घरातून ६० हजार रोख रक्कम, सोन्या-चांदीचे दागिने लुटले. तसेच कोळेकर यांच्या घरातून १ लाख ५१ हजार रुपये व दागिने असा ऐवज लुटून नेला. कोळेकर यांच्या घरात दरोडेखोरांना विरोध करणाऱ्या हिराबाई दत्तू कोळेकर यांना मारहाण केल्यामुळे त्या गंभीर जखमी झाल्या आहेत.

दरोडा टाकल्यानंतर दरोडेखोर दुचाकीवरून पसार झाले. गावात दरोडा पडल्याचे समजताच अनेकजण जमले. नागरिकांनी डायल ११२ वर माहिती दिली. त्यामुळे काही मिनिटांतच पोलिसांची गाडी घटनास्थळी दाखल झाली. तोपर्यंत दरोडेखोर दूरवर गेले होते. दरोडेखोरांना पकडण्यासाठी पहाटेपासून पोलिसांचा फौजफाटा सर्वत्र फिरत होता. स्थानिक गुन्हे अन्वेषण, कवठेमहांकाळसह मिरज ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस शोध घेत होते. सायंकाळपर्यंत एका संशयितास ताब्यात घेतले. परंतु संशयिताची चौकशी सुरू असल्यामुळे ठोस माहिती पोलिसांनी दिली नाही.

चोरीच्या मोबाईलवरून माग

दरोडेखोरांपैकी एकाने दरोडा टाकताना एका घरातील महिलेचा मोबाईल चोरला होता. यावेळी पोलिसांनी तांत्रिक तपासातून मोबाईलचे ठिकाण शाेधले. यावेळी दरोडेखोर नागज फाटा येथे असल्याचे समजले. यावेळी पोलिसांनी त्यांचा माग काढून शोध घेण्याचा प्रयत्न केला. परंतु दरोडखोरांना पोलिस मागावर असल्याचे लक्षात येताच त्यांनी पलायन केले.

परिसरात थरारनाट्य

दरोडेखोरांच्या मागावर असलेल्या कवठेमहांकाळ पोलिसांच्या दुसऱ्या गाडीने दरोडेखोरांना कुची येथे गाठले, तेव्हा दुचाकी टाकून दरोडेखोर तेथील डाळिंबाच्या बागेत लपून बसले. यावेळी दरोडेखोर पोलिसांना दगडे मारू लागले. मिरज येथील उपअधीक्षक प्रणिल गिल्डा तितक्यात पोहचले होते. बागेतून दरोडेखोरांची दगडफेक सुरूच होती. त्यामुळे गिल्डा यांनी हवेत गोळीबार केला. तेव्हा दरोडेखोरानी तेथून पलायन केले.

Web Title: Armed robbery in Kerewadi, Arewadi sangli district; Stone pelting on police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.