शेगावला सशस्त्र दरोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2018 12:07 AM2018-11-22T00:07:45+5:302018-11-22T00:07:50+5:30

शेगाव : शेगाव (ता. जत) येथे साहेबराव विठ्ठल शिंदे यांच्या घरावर मंगळवारी मध्यरात्री पावणेतीनच्या दरम्यान सशस्त्र दरोडा पडला. पाच ...

Armed robbery at Shegawa | शेगावला सशस्त्र दरोडा

शेगावला सशस्त्र दरोडा

Next

शेगाव : शेगाव (ता. जत) येथे साहेबराव विठ्ठल शिंदे यांच्या घरावर मंगळवारी मध्यरात्री पावणेतीनच्या दरम्यान सशस्त्र दरोडा पडला. पाच ते सात दरोडेखोरांनी रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवत शिंदे व त्यांच्या पत्नी वर्षाराणी यांना मारहाण करून तीन लाखांची रोकड, सात तोळे सोन्याचे दागिने, मोबाईल, सीसीटीव्हीचा अ‍ॅडॉप्टर असा सहा लाखांचा ऐवज लंपास केला. सोमवारी रात्री कुकटोळी (ता. कवठेमहांकाळ) येथील दरोड्याची घटना ताजी असतानाच हा प्रकार घडल्याने घबराट पसरली आहे.
जत-सांगोला रस्त्यावरील शेगाव येथे साहेबराव शिंदे यांचा सिमेंट, वीट, स्टील व प्लंबिंग साहित्य विक्रीचा व्यवसाय आहे. ते शेगाव ग्रामपंचायतीचे सदस्य आहेत. त्यांचे घर जत रस्त्याला बोराडे पेट्रोल पंपाच्या पूर्वेस आहे. सोमवारी शेगावचा आठवडा बाजार असल्याने दुकानातील विक्रीतून एक लाख साठ हजार रुपये आले होते. शिवाय मंगळवारी त्यांनी बँकेतून एक लाख चाळीस हजार रुपये काढले होते. हे तीन लाख रुपये मिरजेतील विक्रेत्यांना देण्यासाठी त्यांनी घरीच तिजोरीत ठेवले होते. मंगळवारी रात्री ते नेहमीप्रमाणे दुकान बंद करून घरी आले. पत्नी वर्षाराणी शिंदे (वय २४), मुले आविष्कार (७) व अभिमन्यू (४) असे चौघेजण झोपले. रात्री पावणेतीनच्या सुमारास दरवाजावर काहीतरी पडल्याचा मोठा आवाज झाला. काही समजण्याच्या आतच चोरट्यांनी मोठा दगड टाकून दरवाजा फोडला व पाच ते सातजण आत आले. त्यांनी पायात पांढरे बूट, हातात काळे मोजे, काळे जॅकेट घातले होते. तोंडाला पांढरा मास्क लावलेला होता.
दरोडेखोरांनी घरात येताच शिंदे पती-पत्नीस मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर ठार मारण्याची धमकी देत पैसे व सोन्याच्या दागिन्यांची मागणी केली. वर्षाराणी यांनी गळ्यातील दागिने, मणी-मंगळसूत्र, कानातील कर्णफुले, हातातील बांगड्या, मुलांचे सोने काढून दिले. दरोडेखोरांनी साहेबराव शिंदे यांच्या हातातील सोन्याच्या अंगठ्या व गळ्यातील सोनसाखळी मारहाण करून काढून घेतली. शिवाय रुमालात गुंडाळलेले पिस्तूल दाखवीत आणखी पैशाची मागणी करीत कपाटात ठेवलेले रोख तीन लाख रुपये काढून देण्यास भाग पाडले. ते घेऊन सर्वजण पसार झाले. दरोडेखोरांनी जाताना शिंदे पती-पत्नीचे मोबाईलही पळविले. शिंदे यांनी घराबाहेर दोन ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. दरोडेखोरांनी जाताना सीसीटीव्हीचा अ‍ॅडॉप्टरही पळविला.
दरोडेखोरांनी केलेल्या मारहाणीत साहेबराव व त्यांच्या पत्नीच्या हातावर, पाठीवर गंभीर जखमा झाल्या आहेत. सकाळी विटा येथील पोलीस अधीक्षक अमरसिंह निंबाळकर, जतचे पोलीस निरीक्षक अशोक भवड यांनी घटनास्थळी भेट दिली; तर दुपारी स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे श्वानपथक, ठसेतज्ज्ञ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. यावेळी श्वानपथक शिंदे यांच्या घराच्या पश्चिम दिशेपासून उत्तरेला २०० मीटर अंतरावर जाऊन वाळेखिंडी रस्त्याला घुटमळले. चोरट्यांची एक चप्पल घराच्या पश्चिमेला बोराडे यांच्या शेतात सापडली. पोलीस निरीक्षक रणजित तपास गुंडरे करीत आहेत.
‘लोकमत’ने आवाज उठवला होता
शेगाव येथे वारंवार चोरीच्या घटना घडल्या आहेत. वाळेखिंडी येथेही गेल्याच महिन्यात दुकानात चोरीची घटना घडली. शेगाव येथील पोलीस चौकी कायम बंद असल्याने चोरीच्या घटना घडत असल्याच्या बातम्या ‘लोकमत’ने वारंवार देऊन आवाज उठवला होता. त्याला लोकांनी प्रतिसाद तर दिलाच, शिवाय पोलीस चौकी कायम बंद असल्याचे लेखी निवेदन युवा नेते विजय पाटील यांनी पोलीस निरीक्षक अशोक भवड यांना दिले. शेवटी पोलीस चौकी सुरू झाली; पण नव्याचे नऊ दिवस याप्रमाणे पुन्हा चौकी बंद झाली. घटना घडली त्या दिवशीसुद्धा पोलीस चौकी बंदच असल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात होता.
शेजाऱ्यांच्या घरांना कड्या
शिंदे यांच्या घरासमोर जेसीबीचालक संतोष राठोड राहतात. मध्यरात्री घराबाहेर जाण्यासाठी दरवाजा उघडण्याचा त्यांनी प्रयत्न केला, परंतु दरोडेखोरांनी बाहेरून कडी घातल्याने दरवाजा बंद असल्याचे त्यांच्या लक्षात आले. राठोड यांनी समोरील दत्ता शिंदे यांना मोबाईलवर संपर्क साधून बाहेरून दरवाजा उघडण्यास सांगितले. हे दोघे बाहेर आले असता, शिंदे कुटुंबीयांचा आरडाओरडा ऐकू आला. तोपर्यंत दरोडेखोर पसार झाले. दत्ता शिंदे यांनी सरपंच रवींद्र शिंदे यांना माहिती दिली. सरपंच शिंदे यांनी पोलिसांना कळविले.
दरोडेखोरांचे फुटेज ताब्यात
साहेबराव शिंदे यांनी घराच्या समोरील शौचालयाच्या बाजूला व घराच्या पूर्वेकडील पत्र्याच्या शेडवर असे दोन सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत. ठीक २ वाजून ४८ मिनिटांनी घराच्या अंगणात प्रवेश केला. २ वाजून ५३ मिनिटांनी ते कॅमेरे काढले. हे फुटेजमध्ये पोलिसांना दिसून आले आहे. मात्र चोरी करून जाताना सीसीटीव्हीच्या डीव्हीआरऐवजी अ‍ॅडॉप्टर घेऊन गेले. त्यामुळे दोघा दरोडेखोरांचे फुटेज ताब्यात घेतले आहे.

Web Title: Armed robbery at Shegawa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.