सैन्य दलाच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड, सांगलीतील एरंडोली येथे शेतात इमर्जन्सी लँडिंग-video
By संतोष भिसे | Published: May 4, 2024 11:29 AM2024-05-04T11:29:56+5:302024-05-04T11:32:08+5:30
हेलिकॉप्टर पाहण्यासाठी पंचक्रोशीतून गर्दी
सांगली : एरंडोली (ता. मिरज) येथे आज, शनिवारी सकाळी अचानक भालेमोठे हेलिकॉप्टर उतरल्याने गावकऱ्यात एकच खळबळ उडाली. सैन्य दलाच्या हेलिकॉप्टरचे तांत्रिक बिघाडमुळे इमर्जन्सी लँडिंग करावे लागले. हेलिकॉप्टर पाहण्यासाठी पंचक्रोशीतून एकच गर्दी झाली होती.
शनिवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास हेलिकॉप्टरने इमर्जन्सी लँडिंग केले. त्यामध्ये तिघे जवान होते. मोठा आवाज करीत एरंडोलीच्या अवकाशातून भिरभीरत निघालेल्या हेलिकॉप्टरकडे ग्रामस्थ मान उंचावून पाहत होते, आणि पाहता पाहता ते त्यांच्यासमोरच गावात उतरले. जान्हवी देवीच्या मंदिरासमोरील अप्पासाहेब हाक्के आणि परशुराम हाक्के यांच्या शेतात ते उतरले. ते नाशिकहून बंगळूरूला निघाले होते. त्यामध्ये कॅप्टनसह तीन जवान आहेत. सैन्याला रसद पुरविण्यासाठी त्याचा वापर होतो. तांत्रिक बिघाड झाल्याने इमर्जन्सी लँडिंग करावे लागल्याचे त्यांनी सांगितले.
एरंडोली ग्रामस्थांनी जवानाना चहा, नाश्ता, वैद्यकीय मदत किंवा अन्य मदतीविषयी विचारणा केली, तेव्हा ती त्यांनी नाकारली. बघ्यांची गर्दी हटविण्याची विनंती केली, ग्रामस्थांनी याची कल्पना पोलिसांना दिली, त्यानंतर पोलिसांनी धाव घेत गर्दीवर नियंत्रण मिळविले. हेलिकॉप्टरचा बिघाड दूर करण्यासाठी पथक येणार असल्याची माहिती मिळाली.
सांगली जिल्ह्यातील एरंडोली (ता. मिरज ) येथे शनिवारी सकाळी अचानक भालेमोठे हेलिकॉप्टर उतरलं, सैन्य दलाच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाडमुळे इमर्जन्सी लँडिंग #Sanglipic.twitter.com/faYIwjPV07
— Lokmat (@lokmat) May 4, 2024