सेना, राणेंशी मुख्यमंत्र्यांचा डबल गेम : जयंत पाटील-शिवसेना सत्तेतून बाहेर पडली तरी राष्ट्रवादी भाजपला पाठिंबा देणार नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2017 12:30 AM2017-12-28T00:30:22+5:302017-12-28T00:33:08+5:30
इस्लामपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकीकडे नारायण राणे यांना मंत्रिमंडळात घेणार म्हणतात, तर दुसरीकडे शिवसेनेला चुचकारताना त्यांना घेणार नाही
इस्लामपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकीकडे नारायण राणे यांना मंत्रिमंडळात घेणार म्हणतात, तर दुसरीकडे शिवसेनेला चुचकारताना त्यांना घेणार नाही म्हणून सांगतात. या डबल गेममुळे सरकारची विश्वासार्हता धोक्यात आली आहे. राणेंचा मंत्रिमंडळ प्रवेश शिवसेनेने मान्य केला, तर त्यांचे घोंगडे कोठेतरी अडकले आहे, हे सिध्द होईल.
तथापि राणेंच्या प्रवेशाने शिवसेनेने सरकारचा पाठिंबा काढला, तर राष्ट्रवादी भाजपला पाठिंबा देणार नाही, अशी माहिती राष्ट्रवादीचे गटनेते, आमदार जयंत पाटील यांनी बुधवारी दिली.
नागपूर येथील हिवाळी अधिवेशन संपवून आल्यानंतर आमदार पाटील यांनी येथे पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, हल्लाबोल यात्रेमुळे सरकारवर दबाव निर्माण करून शेतकºयांची कर्जमाफी, वाया गेलेल्या शेतीमालाला नुकसानभरपाई असे निर्णय सरकारला घ्यायला भाग पाडले. शेतकरी आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते शेतकºयांच्या प्रश्नावर रस्त्यावर उतरल्यामुळे सरकारला त्याची नोंद घ्यावी लागली. अधिवेशनात अनेकविध प्रश्नांवर सरकारला धारेवर धरले. उत्तर देण्याऐवजी मंत्र्यांनी चलाखीने या प्रश्नांना बगल दिली.
ते म्हणाले की, शेतकºयांच्या कर्जमाफीचे पैसे ३१ मार्चपर्यंत लांबविण्याचा इरादा होता. मात्र आमच्या हल्लाबोलमुळे कर्जमाफीचे पैसे वर्ग केले आहेत, करीत आहोत, असे सरकारला जाहीर करणे भाग पडले. मुख्यमंत्री फडणवीस शिवसेना व नारायण राणे यांच्याबरोबर ‘डबल गेम’ खेळत आहेत.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यातील सत्ता स्थापनेवेळी, भाजपला गरज पडल्यास पाठिंबा देऊ अशी भूमिका घेतली होती. त्याचे समर्थन करताना आमदार पाटील म्हणाले की, राष्ट्रवादीच्या या भूमिकेमुळे गेल्या साडेतीन वर्षात भाजप-सेनेमध्ये विश्वासाचे वातावरण दिसलेले नाही. जर लाट नसेल, तर भाजप साम, दाम, दंड, भेदाचा वापर करून काठावर का होईना, कशी निवडणूक जिंकतो, हे संपूर्ण भारताने गुजरातच्या निवडणुकीत पाहिले.
महाराष्ट्रात राष्ट्रवादी व काँग्रेस एकत्र आले व त्यांनी समविचारी पक्षांना बरोबर घेतले, तर राज्यात भाजपचे सरकार पायउतार होऊ शकते. सरकारच्या विरोधात जनतेत असंतोष वाढत आहे. तो २0१९ पर्यंत टोकाला जाऊ शकतो. यामुळे आगामी काळात महराष्ट्रात सत्ताबदल होणार हे निश्चित आहे.
आ. पाटील म्हणाले, विदर्भात कापसावरील बोंडअळी आणि धान्यावरील तुडतुड्या रोगाबाबत बियाणे कंपन्या, विमा कंपनी व केंद्र सरकारच्या मदत योजनेतून का होईना, भरपाई देऊ, अशी घोषणा सरकारला करावी लागली. अर्थात यामधून शेतकºयांच्या पदरात काही पडेल असे वाटत नाही.
खा. राजू शेट्टींशी आघाडी?
खा. राजू शेट्टी यांच्याशी आघाडी करणार का?, असा प्रश्न पत्रकारांनी उपस्थित केला. त्यावर आ. पाटील म्हणाले की, तशी भेट अथवा चर्चा झालेली नाही. भाजपने निवडणुकीत देशातील शेतकºयांना दिलेली आश्वासने पाळलेली नाहीत. त्यांनी फसवणूक केली आहे, अशी शेट्टी यांची भावना झाल्याने ते सध्या भाजप सरकारच्या विरोधी काम करीत आहेत, एवढे माहीत आहे.