साठ आरोग्य केंद्रांत २४० खाटांची व्यवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:28 AM2021-04-20T04:28:11+5:302021-04-20T04:28:11+5:30
सांगली : जिल्ह्यातील ६० आरोग्य केंद्रांमध्ये २४० खाटांची व्यवस्था केली आहे. तेथे ऑक्सिजनसह औषधांचा साठाही उपलब्ध आहे. डॉक्टर, आरोग्य ...
सांगली : जिल्ह्यातील ६० आरोग्य केंद्रांमध्ये २४० खाटांची व्यवस्था केली आहे. तेथे ऑक्सिजनसह औषधांचा साठाही उपलब्ध आहे. डॉक्टर, आरोग्य कर्मचारी चोवीस तास उपलब्ध असल्यामुळे कोरोना रुग्णांवर तत्काळ उपचार होतील, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली.
ते म्हणाले की, कोरोना रुग्णांच्या संपर्कात आल्यानंतर कोरोना चाचणी करून तत्काळ उपचार घेतले पाहिजेत. यामुळे संसर्ग थांबण्यास मदत होणार आहे. रुग्ण वाढल्यामुळे जिल्ह्यातील प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये चार खाटांची सोय केली आहे. ऑक्सिजन आणि औषध साठाही मुबलक असल्यामुळे रुग्णांनी भीती बाळगण्याची गरज नाही. एखाद्या रुग्णाची ऑक्सिजन पातळी कमी होत असेल तर तत्काळ व्यवस्था करून रुग्णाची प्रकृती ठीक केली जाणार आहे. त्यानंतर त्या रुग्णांची परिस्थिती पाहून अन्यत्र पाठविण्याची व्यवस्था केली जाईल. आरोग्य केंद्रांकडे चांगल्या दर्जाची रुग्णवाहिकाही उपलब्ध आहे. यामुळे जिल्हा स्तरावरील खाटा कमी पडण्याच्या तक्रारी निर्माण होणार नाहीत.
चौकट -
होम आयसोलेशनमध्ये तीन हजार रुग्ण
गंभीर लक्षणे नसलेले तीन हजार रुग्ण होम आयसोलेशनमध्ये उपचार घेत आहेत. त्यांना जिल्हा परिषदेच्या कक्षातून रोज फोनद्वारे संपर्क केला जातो. आरोग्य कर्मचारी भेट देऊन औषधोपचार देत आहेत. आरोग्यसेविका गेल्या की नाही, यावरही कक्षातून वॉच ठेवला जात आहे. रुग्णांना जिल्हा परिषदेने औषधोपचाराचे किटही दिले आहे, असेही डूडी यांनी सांगितले.
चौकट
...अन्यथा आरोग्य कर्मचाऱ्यांवर कारवाई
रुग्णांच्या घरी भेट देऊन त्यांची विचापूस करणे आरोग्य कर्मचाऱ्यांची जबाबदारी आहे. रविवारी कडेगाव, तासगाव आणि जत तालुक्यांतील तीन आरोग्य कर्मचाऱ्यांनी होम आयसोलेशनमधील रुग्णांच्या घरी भेट दिली नाही. कक्षातून फोन गेल्यामुळे हा प्रकार उजेडात आला आहे. संबंधित आरोग्य कर्मचाऱ्यांकडे विचारणा केली आहे. प्रथम समज दिली असून, पुन्हा असा प्रकार घडल्यास कारवाई होईल, असा इशाराही डुडी यांनी दिला.