कुरळप, ऐतवडे खुर्द येथे ३०० खाटांची व्यवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:19 AM2021-06-25T04:19:29+5:302021-06-25T04:19:29+5:30
इस्लामपूर : सध्या कोविडच्या संभाव्य तिसऱ्या लाटेमध्ये शालेय विद्यार्थ्यांना अधिक धोका आहे, असे शासन स्तरावरील अनेक तज्ज्ञांचे मत आहे. ...
इस्लामपूर : सध्या कोविडच्या संभाव्य तिसऱ्या लाटेमध्ये शालेय विद्यार्थ्यांना अधिक धोका आहे, असे शासन स्तरावरील अनेक तज्ज्ञांचे मत आहे. यामुळे ऐतवडे खुर्द (ता. वाळवा) येथील वारणा शिक्षण संस्थेने सर्व शाखांच्या ३,५०० विद्यार्थ्यांसाठी ‘माझा विद्यार्थी, माझी जबाबदारी’ हा उपक्रम शाळा व महाविद्यालय संस्था स्वत:च्या जबाबदारीवर राबविणार आहे.
विद्यार्थ्यांच्या भविष्यकालीन आरोग्यविषयक अडचणी निर्माण झाल्यास कुरळप (ता. वाळवा) येथे संस्थेने १०० खाटांच्या रुग्णालयाची स्वच्छतागृहांसह तयारी केली असून, ऐतवडे खुर्द येथे २०० खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती पश्चिम महाराष्ट्र सहकारी संघाचे अध्यक्ष व वारणा शिक्षण संस्थेचे सचिव डॉ. प्रताप पाटील यांनी दिली.
ते म्हणाले, वारणा शिक्षण संस्था सुवर्णमहोत्सवी वर्षात पदार्पण करत असून, ग्रामीण आणि डोंगरी भागांमध्ये काम करत आहे. संस्थेने यापूर्वीही अशा आपत्तीकालीन प्रसंगावेळी विद्यार्थ्यांची जबाबदारी घेऊन काम केले आहे. तिसऱ्या लाटेमध्ये विद्यार्थी बाधित झाल्यास या विद्यार्थ्यांची निवास व भोजन व्यवस्था विनामूल्य करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी वारणा शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष इलाही मुल्ला, खजिनदार बाबासाहेब पाटील, महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष प्रा. एस. के. पाटील, संस्थेचे विश्वस्त ए. एल. खराडे, जगन्नाथ पाटील, बाबासाहेब सावर्डेकर, सयाजी पाटील तसेच मुख्याध्यापक जे. आर. शेटे, एम. एम. कुरणे उपस्थित होते.