फडणवीसांच्या सभेत कोंबड्या सोडणाऱ्या कार्यकर्त्यांची धरपकड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2020 04:14 AM2020-12-28T04:14:56+5:302020-12-28T04:14:56+5:30
लोकमत न्यूज नेटनर्क सांगली : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या इस्लामपुरातील सभेत कडकनाथ कोंबड्या सोडण्याचा इशारा देणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी ...
लोकमत न्यूज नेटनर्क
सांगली : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या इस्लामपुरातील सभेत कडकनाथ कोंबड्या सोडण्याचा इशारा देणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांची पोलिसांनी धरपकड केली. त्यांना पोलीस ठाण्यात नेऊन बसवून ठेवले. या दरम्यान पोलिसांशी कार्यकर्त्यांची चांगलीच झटापट झाली. कार्यकर्त्यांनी पोलिसांवरच कोंबड्या उधळल्या.
माजी मंत्री सदाभाऊ खोत व आमदार गोपीचंद पडळकर यांनी कृषी कायद्यांच्या समर्थनार्थ २४ डिसेंबरपासून जिल्ह्यात किसान आत्मनिर्भर यात्रा सुरू केली आहे. तिची सांगता इस्लामपुरातील गांधी चौकात रविवारी संध्याकाळी होती. यासाठी फडणवीस जिल्हा दौऱ्यावर येणार होते. त्यांच्या सभेत कडकनाथ कोंबड्या सोडण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला होता. किसान यात्रेदरम्यान सदाभाऊ खोत यांनी ‘स्वाभिमानी’चे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्यावरही जोरदार टीका केली होती. त्यामुळे संतापलेल्या कार्यकर्त्यांनी सांगली ते इस्लामपूर कडकनाथ संघर्ष यात्रा आयोजित केली होती.
रविवारी दुपारी सांगलीत स्टेशन चौकात कार्यकर्त्यांनी कडकनाथ कोंबड्या हातात घेऊन जोरदार निदर्शने केली. भाजप व खोत यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. या दरम्यान, पोलिसांनी त्यांची धरपकड केली. इस्लामपूरकडे कूच करू पाहणाऱ्या कार्यकर्त्यांना अटकाव केला. जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांच्यासह पंचवीसभर कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. सभेत उधळण्यासाठी सोबत आणलेल्या कडकनाथ कोंबड्या हिसकावण्याचा प्रयत्न केला असता, कार्यकर्त्यांनी पोलिसांवरच उधळल्या. यावेळी पोलीस व कार्यकर्त्यांची झटापटही झाली.
चौकट
सूत्रधाराच्या मुसक्या आवळण्याची मागणी
खराडे म्हणाले की, कडकनाथ घोटाळ्यातील सूत्रधाराच्या मुसक्या पोलिसांनी आवळाव्यात. त्याची मालमत्ता जप्त करावी, अशी आमची मागणी आहे. पोलिसांनी कितीही जबरदस्ती केली तरी आम्ही शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिल्याविना स्वस्थ राहणार नाही.