गोपीचंद पडळकरांना तातडीने अटक करा; शिवसेनेची मागणी
By अविनाश कोळी | Published: January 7, 2023 03:16 PM2023-01-07T15:16:32+5:302023-01-07T15:17:14+5:30
पोलिस उपअधीक्षक, निरीक्षकांना निलंबित करा
अविनाश कोळी
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : मिरजेत जेसीबीने घरे पाडून लोकांना बेघर केल्याप्रकरणी भाजपचे ब्रम्हानंद पडळकर यांच्यासह त्यांचे बंधू आ. गोपीचंद पडळकरांनाही अटक करा, अशी मागणी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख शंभूराज काटकर यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना केली.
त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मिरजेत ७० वर्षांपासून राहणाऱ्या सर्वसामान्य माणसांच्या पाठीशी उभे न राहता त्यांना रात्रीत बेघर करून त्यांची घरे पाडायला उभे राहणारे पडळकर बंधू आणि लोकांकडे कागदपत्रे मागणारे पोलिस हे सगळेच एकमेकांना सामील आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या ताकदीमुळेच एक होऊन लोकांना पिटाळून लावण्याच्या कामात ते उतरले होते, हे दिसून आले आहे.
घरे पाडायला गेलेल्या लोकांऐवजी सर्वसामान्य माणसांवर जेसीबी अडवल्याबद्दल गुन्हे दाखल झाले असतील तर ते तत्काळ मागे घेण्यात यावेत. या घटनेस जबाबदार धरून मिरजेचे पोलिस उपअधीक्षक व संबंधित पोलिस निरीक्षक यांचा गुन्हेगारी कृत्यात सहभाग लक्षात घेऊन त्यांना निलंबित करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा.
फडणवीस यांनी राजीनामा द्यावा
मिरजेतील संपूर्ण घटनेला भाजपचा पाठींबा आहे. कायदा हातात घेणाऱ्या पडळकर बंधूंना अटक करावी. या घटनेची जबाबदारी स्वीकारून उपमुख्यमंत्री व गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी काटकर यांनी केली आहे.