महात्मा फुलेंचा अपमान करणाऱ्यास अटक करा - अमोल वेटम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2021 01:39 PM2021-03-29T13:39:24+5:302021-03-29T13:44:39+5:30
Mahatma Phule Wada sangli-पुण्यातील लोकसेवा अॅकेडमीचे संचालक अप्पा हातनुरे यांनी महात्मा फुले यांच्याबद्दल केलेल्या अपमानास्पद वक्तव्याचा निषेध आम्ही करीत आहोत. याप्रकरणी त्यांना तातडीने अटक करावी, अशी मागणी रिपब्लिकन स्टुडंट युनियनचे महासचिव अमोल वेटम यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली आहे.
सांगली : पुण्यातील लोकसेवा अॅकेडमीचे संचालक अप्पा हातनुरे यांनी महात्मा फुले यांच्याबद्दल केलेल्या अपमानास्पद वक्तव्याचा निषेध आम्ही करीत आहोत. याप्रकरणी त्यांना तातडीने अटक करावी, अशी मागणी रिपब्लिकन स्टुडंट युनियनचे महासचिव अमोल वेटम यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविलेल्या पत्रात वेटम यांनी म्हटले आहे की, राज्यसेवा परीक्षेसाठी लाखो विद्यार्थी हे राज्यातील विविध भागातून पुणे येथे क्लासेसला जात असतात. याच पुण्यामध्ये महात्मा जोतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी देशातील पहिली शाळा काढून स्त्री-शिक्षण, अस्पृश्य लोकांना शिक्षण देण्याचा इतिहास घडवला.
आजही फुले दाम्पत्यांचे सामाजिक कार्य अनेक समाजकंटकांच्या मनात खुपत असते. शिवराय-फुले-शाहू-आंबेडकर यांची बदनामी विविध स्तरातून केली जात आहे. पुस्तकाच्या माध्यमातून असो अथवा संबंधित खासगी क्लासेसच्या वा सोशल मिडीयाच्या माध्यमातून खोटा इतिहास- पुरावे पेरण्याचे काम होत आहे.
याचाच एक भाग म्हणजे पुण्यातील सदाशिव पेठेतील एका अॅकेडमीचे संचालक अप्पा हातनुरे यांनी संयुक्त पूर्व परीक्षाबाबतचा एक व्हिडिओ प्रसारीत केला आहे. यामधून हातनुरे याने महात्मा जोतिबा फुले यांच्या आजारपणाबाबत तसेच त्यांच्या मृत्यूसंदर्भात अत्यंत खालच्या दर्जेची भाषा वापरून जाहिरपणे अपमानित केले आहे.
हा व्हिडिओ संपूर्ण महाराष्ट्रात व्हायरल होताच लोकांमध्ये रोष, संतापाची भावना निर्माण झाली. लोकांचा आक्रोश वाढत असल्याचे पाहून अप्पा हातनुरे या समाजकंटकाने माफीचा व्हिडिओ प्रसिद्ध केला. आधी जाणीवपूर्वक चूक करून माफी मागायची असा नवीनच ट्रेंड सुरु झाला आहे. महापुरुषांची बदनामी व सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्या अप्पा हातनुरे यांना तत्काळ अटक व्हावी, त्यांची खासगी स्पर्धा क्लासेसची परवानगी रद्द करावी अशी मागणी वेटम यांनी केली आहे.