राज ठाकरेंना दिलासा! शिराळ्यातील खटल्यात अटक वॉरंट रद्द; गेल्या १४ वर्षांपासून खटला प्रलंबित
By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2023 12:15 PM2023-01-17T12:15:02+5:302023-01-17T12:15:31+5:30
आठ जणांना अजामीनपात्र अटक वॉरंटचा हुकूम
शिराळा : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह दहा जणांचा सुनावणीवेळी अनुपस्थित राहण्याचा विनंती अर्ज शिराळा येथील प्रथम वर्ग न्यायाधीश श्रीमती प्रीती अ. श्रीराम यांनी नामंजूर केला. तसेच आठ जणांना अजामीनपात्र अटक वॉरंटचा हुकूम काढला आहे. तर राज ठाकरे व शिरीष पालकर यांचा अजामीनपात्र अटक वॉरट रद्द केले आहे. पुढील सुनावणी दि. ४ फेब्रुवारी रोजी होणार आहे.
शेडगेवाडी (ता. शिराळा) येथे २००८ मध्ये मनसे जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत यांनी राज ठाकरे यांना अटक झाली म्हणून आंदोलन केले होते. या आंदोलनाचा खटला येथील न्यायालयात गेल्या १४ वर्षांपासून प्रलंबित आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरुद्ध सुरू असलेल्या खटल्यामध्ये त्यांचा प्रत्यक्ष सहभाग दिसून येत नाही. त्यामुळे त्यांचे नाव या खटल्यातून वगळावे असा अर्ज प्रथम वर्ग न्यायाधीश प्रीती श्रीराम यांनी फेटाळला होता.
सोमवारी सुनावणीवेळी राज ठाकरे हे राजकीय नेते आहेत त्यांना सभेसाठी परगावी जावे लागले, शिरीष पालकर यांना घरगुती कामासाठी परगावी जावे लागले आहे. तसेच तानाजी सावंत यांच्यासह आठ जण नोकरी व कामधंद्यासाठी परगावी जावे लागले आहे. त्यामुळे या सर्वांना अनुपस्थित राहण्यासाठी परवानगी मिळावी असा अर्ज आरोपीच्या वतीने ॲड. विजय खरात, ॲड. सतीश कदम, ॲड. रवी पाटील यांनी दिला होता.
याबाबत सरकारी वकील संदीप पाटील यांनी सर्वांसाठी कायदा समान आहे, राजकीय सभासाठी व घरगुती कामासाठी अनुपस्थित राहणे हे कायद्यास अनुसरून नाही. त्यामुळे त्यांचा अर्ज नामंजूर व्हावा व त्यांचे विरुद्ध अजामीनपात्र अटक वॉरंट काढावे अशी हरकत घेतली.
दहा आरोपींचा अर्ज नामंजूर
दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून न्यायाधीश प्रीती अ. श्रीराम यांनी सर्व दहा आरोपींचा अर्ज नामंजूर केला. तसेच अजामीनपात्र अटक वॉरंट काढले होता. यानंतर आरोपींच्या वकिलांकडून राज ठाकरे व शिरीष पालकर यांचे अजामीनपात्र अटक वॉरंट रद्द करण्याचा विनंती अर्ज दाखल करण्यात आला. तो मंजूर होऊन या दोघाचे अटक वॉरंट रद्द करण्यात आले आहे.