कुंडलमध्ये फरारी गुन्हेगारास अटक; गंभीर गुन्हे : १४ वर्षे गुंगारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2018 10:39 AM2018-12-21T10:39:01+5:302018-12-21T10:40:00+5:30
गुजरात पोलीस दलात चोरी, फसवणुकीसह गंभीर गुन्हे दाखल झालेल्या कुंडल (ता. पलूस) येथील सचिन बबनराव लाड (वय ४०) या फरारी गुन्हेगारास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने गुरुवारी अटक केली. तो १४ वर्षे पोलिसांना गुंगारा देत फरार होता.
सांगली : गुजरात पोलीस दलात चोरी, फसवणुकीसह गंभीर गुन्हे दाखल झालेल्या कुंडल (ता. पलूस) येथील सचिन बबनराव लाड (वय ४०) या फरारी गुन्हेगारास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने गुरुवारी अटक केली. तो १४ वर्षे पोलिसांना गुंगारा देत फरार होता.
जिल्हा पोलीसप्रमुख सुहेल शर्मा यांनी रेकॉर्डवरील फरारी गुन्हेगारांचा शोध घेण्याचे आदेश दिले आहेत. कुंडल येथील सचिन लाड याच्याविरुद्ध गुजरातमधील पादरा पोलीस ठाण्यामध्ये चोरी व फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. तेथील पोलीस त्याच्या मागावर होते, पण तो सापडत नाही, अशी माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषणला मिळाली.
पोलीस निरीक्षक श्रीकांत पिंगळे, सहायक पोलीस निरीक्षक अमितकुमार पाटील, कुंडलच्या सहायक निरीक्षक जयश्री पाटील, पोलीस शिपाई सतीश आलदर, सचिन कनप, कुबेर खोत यांच्या पथकाने त्याच्या घरावर छापा टाकला, त्यावेळी लाड सापडला. त्याला ताब्यात घेतल्याची नोंद कुंडल पोलीस ठाण्यात करण्यात आली.
पादरा पोलिसांना याची माहिती देण्यात आली असून, ते त्याला ताब्यात घेण्यासाठी सांगलीत दाखल झाले आहेत. गुजरात पोलिसांना १४ वर्षे गुंगारा देत तो फरार होता.