Crime News: चैनीसाठी पैसे नाही तर तो चोरायचा...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2022 02:17 PM2022-04-06T14:17:52+5:302022-04-06T14:18:46+5:30

गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पथक साखराळे गावासह शहरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करीत या चोरीच्या घटनेचा माग काढत होते.

Arrested in Nerle Tal. Walwa for stealing animals for luxury | Crime News: चैनीसाठी पैसे नाही तर तो चोरायचा...

Crime News: चैनीसाठी पैसे नाही तर तो चोरायचा...

Next

इस्लामपूर : चैनीसाठी जनावरे चोरणाऱ्या नेर्ले (ता. वाळवा) येथील अट्टल चोरट्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने मुसक्या आवळल्या. त्याच्याकडून ३५ हजार रुपये किमतीचे म्हैसुरी खिलार जातीचे खोंड आणि ५० हजार रुपये किमतीची जीप हस्तगत केली.

सूरज ऊर्फ नाऱ्या प्रकाश पाटील (वय २६, रा. नेर्ले), असे या अट्टल चोरट्याचे नाव आहे. त्याला न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. नाऱ्या पाटील याच्याकडून जनावरे चोरीचे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. साखराळे (ता. वाळवा) येथील संभाजी पाटील यांच्या शेतातील शेडचे कुलूप तोडून ३० मार्च रोजी म्हैसुरी खिलार जातीच्या खोंडाची चोरी झाली होती. पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांनी या चोरीचा छडा लावण्याचे आदेश स्थानिक पोलिसांना दिले होते.

त्यानुसार पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पथक साखराळे गावासह शहरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करीत या चोरीच्या घटनेचा माग काढत होते. त्यावेळी सूरज ऊर्फ नाऱ्या पाटील हा जनावरांची चोरी करीत असल्याची माहिती पथकाला मिळाली होती. पथकाने त्याच्यावर पाळत ठेवत चोरीची खात्री केली. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने साखराळे येथील चोरीची कबुली देऊन चोरलेले खोंड आणि गुन्हा करताना वापरलेली जीप (क्र. एमएच २२ बी ७३९७) पथकाच्या ताब्यात दिली. या कारवाईत सहायक पाेलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे, हवालदार दीपक ठोंबरे, अरुण पाटील, शरद जाधव, आलमगीर लतीफ यांनी भाग घेतला.

खोंड आले दावणीला..!

साखराळे येथील संभाजी पाटील यांनी म्हैसुरी खिलार जातीचे हे खोंड जिवापाड जपले होते. ३० मार्चच्या रात्री दावणीचे खोंड चोरीला गेल्याने आपल्या पोटचा गोळा गेल्याच्या भावनेने पाटील कुटुंबीयांचा जीव कासावीस झाला होता. या मुक्या जीवाच्या चोरीचा छडा लावताना गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने तब्बल सात दिवस शोधमोहीम राबवीत नाऱ्या पाटील याला खोंडासह ताब्यात घेतले. हे खोंड पोलिसांनी संभाजी पाटील यांच्याकडे सुपुर्द करताच त्यांनी त्याला मिठी मारून आपल्या आनंदाश्रूंना वाट करून दिली. जिवापाड जपलेले खोंड दावणीला परत आल्याचा आनंद पाटील कुटुंबाला झाला होता.

Web Title: Arrested in Nerle Tal. Walwa for stealing animals for luxury

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.