ऐटबाज युवराजाची कुंडलच्या डोंगरावर वर्षा सहल, तुरेवाल्या भारीट पक्ष्याने वेधले लक्ष
By श्रीनिवास नागे | Published: September 14, 2022 03:12 PM2022-09-14T15:12:55+5:302022-09-14T15:13:34+5:30
उन्हाळी हंगामात पंजाब, हरियाणासह काश्मिर खोऱ्यात आढळणारा हा पक्षी रूबाबदारपणामुळे लक्षवेधक ठरत आहे.
सांगली : पलूस तालुक्यातील क्रांतीभूमी कुंडल परिसरात सध्या वर्षा सहलीला आलेल्या ऐटबाज युवराज (तुरेवाला भारीट) पक्ष्याने तळ ठोकला आहे. डोकीवर तांबूस-काळा तुरा असलेल्या युवराज पक्ष्याचा मुक्काम पक्षीप्रेमींचे लक्ष वेधून घेत आहे. उन्हाळी हंगामात पंजाब, हरियाणासह काश्मिर खोऱ्यात आढळणारा हा पक्षी रूबाबदारपणामुळे लक्षवेधक ठरत आहे.
कुंडलला अतिशय समृद्ध निसर्गसौंदर्य लाभले आहे. सह्याद्री पर्वतरांगाच्या शेवटच्या टोकाला असणारा कुंडलचा डोंगर पानाफुलांच्या हिरवाईने बहरून गेला आहे. या डोंगरावर झरी पार्श्वनाथ हे जैन धर्मीयांचे प्रसिद्ध तीर्थस्थान आहे. तेथे डोक्यावर जिरेटोपासारखा तांबूस-काळा तुरा मिरवणारा युवराज पक्षी कधी डोंगराच्या पाषाणावर, कधी झाड-वेली, तर कधी पॅगोडावर बसून जणू काही श्रावणगीत गातो आहे. या ऐटबाज युवराजाच्या काळ्या पोटावर तपकिरी रंगाचे चिलखत घातल्यासारखे पंख उठून दिसतात.
युवराज पक्ष्याला ‘तुरेवाला भारीट’ नावाने ओळखले जाते. याशिवाय शेंडीवाला रेडवा, लहान काकड कुंभार, बोचुरडी, डोंगरफेंसा, दाबुडका, फेंस किंवा शेंडूरला फेंसा अशी त्याला अन्य नावेदेखील आहेत. ‘इबर्ड’सारख्या संकेतस्थळावरील नोंदीवरून हा पक्षी पावसाळा-हिवाळ्यात गुजरात, महाराष्ट्रात आढळतो. उन्हाळ्यात भारताच्या उत्तरेकडील जम्मू-काश्मीर, हरियाणा, पंजाब या राज्यांमध्ये स्थलांतर करतो.
चिमणीच्या आकाराचा हा युवराज पक्षी रंगाने भारद्वाजसारखा असून हा डोंगराळ भागात आढळणारा पक्षी आहे. याची मादी मात्र चंडोलसारखी भुऱ्या रंगाची असते. कुंडल डोंगर परिसरात हा युवराज डिसेंबपर्यंत मुक्कामी असल्याची माहिती पक्षी अभ्यासक संदीप नाझरे यांनी दिली.