सांगलीच्या मंदिरात 'चोर गणपती'चे आगमन, पावणे दोनशे वर्षांची परंपरा
By अविनाश कोळी | Published: September 4, 2024 05:16 PM2024-09-04T17:16:41+5:302024-09-04T17:17:31+5:30
विधिवत पूजन, प्रतिष्ठापना
सांगली : पावणेदोनशे वर्षांची परंपरा लाभलेल्या सांगलीच्या पंचायतन गणेशोत्सवाचा एक भाग असलेल्या चोर गणपतीचे आगमन बुधवारी झाले. विधिवत पूजा करुन त्याची प्रतिष्ठापना करण्यात आली. यानिमित्त पंचायतन गणेशोत्सवास सुरुवात झाली आहे.
चिंतामणराव आप्पासाहेब पटवर्धन यांनी ही चोर गणपतीची परंपरा सुरू केली. भाद्रपद शुद्ध प्रतिपदेला कागदाच्या लगद्यापासून बनविलेल्या या पर्यावरणपूरक ‘चोर गणपती’चे अत्यंत गुपचूपपणे मंदिरात आगमन होते. या गणपतीची प्रतिष्ठापना गुपचूपपणे होत असल्याने याला चोर गणपती म्हटले जाते. मंदिरातील पंचायतन संस्थान गणेशोत्सवाची सुरुवात ‘चोर गणपती’च्या आगमनाने होते. मंदिरातील गाभाऱ्यात ही गणपतीची मूर्ती विधिपूर्वक बसविली जाते.
या गणपतीची आख्यायिका वगैरे नाही. गणपती उत्सवाची चाहूल लागण्यासाठी तसेच वातावरण निर्मिती एवढाच या मागचा संदर्भ आहे. या चोर गणपतीची मूर्ती कागदाच्या लगद्यापासून तयार केली आहे. सुरुवातीपासून म्हणजे सुमारे पावणेदोनशे वर्षांपासून त्यांचे जतन करण्यात आले आहे. पण, मूर्ती पाहिल्यास कागदी लगद्याची आहे, असे जाणवणारही नाही. नुकतीच रंगरंगोटी करण्यात आल्याने ही मूर्ती अधिक आकर्षक दिसते. चोर गणपती बसताच सांगली व परिसरात वातावरण गणेशमय होऊन गेले. चोर गणपती पाहण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती.
पंचायतन ट्रस्टतर्फे आजपासून कार्यक्रम
सांगलीच्या राजवाडा दरबार हॉलमध्ये पंचायतन गणपपती संस्थान ट्रस्टतर्फे गणेशोत्सवाच्या कार्यक्रमांची सुरुवात ५ सप्टेंबरपासून होणार आहे. त्यामुळे याठिकाणी सुंदर आरास करण्यात आली आहे. सांगलीचे गणपती मंदिरही सजविण्यात आले असून याठिकाणी भाविकांची गर्दी होत आहे.