‘आर्ट ऑफ लिव्हिंग’तर्फे पूरग्रस्तांना मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 04:29 AM2021-08-13T04:29:47+5:302021-08-13T04:29:47+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : आर्ट ऑफ लिव्हिंग आणि बी. एन. वाय. मेलन तसेच इंटरनॅशनल असोसिएशन फॉर ह्युमन व्हॅल्युज ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : आर्ट ऑफ लिव्हिंग आणि बी. एन. वाय. मेलन तसेच इंटरनॅशनल असोसिएशन फॉर ह्युमन व्हॅल्युज यांच्या संयुक्त विद्यमाने सांगलीतील पूरग्रस्तांना अन्नधान्य व गरजेच्या वस्तूंची १२०० किट देण्यात आली.
सर्व संस्थांचे प्रणेते श्री श्री रवी शंकर यांच्या प्रेरणेतून हे सामाजिक कार्य हाती घेतल्याचे पदाधिकाऱ्यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगितले. या पत्रकात त्यांनी म्हटले आहे की, पूरबाधित नागरिकांना होणारा नाहक त्रास, त्यांची सतत होणारी हानी न भरून येणारी आहे. ते प्रगतीपासून दूर जात आहेत. त्यांचे जीवनमान सुरळीत होण्यासाठी मदतीचा हात देण्यात येत आहे. ही मदत जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. २०१९च्या महापुरावेळीही मदत देण्यात आली होती.
कोरोना काळातील उपक्रम म्हणून या सर्व संस्थांमार्फत जिल्ह्यात ४० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन देण्यात आल्या आहेत. यासाठी जिल्हाधिकारी डॉ. चौधरी, आयुक्त नितीन कापडणीस, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांचे सहकार्य लाभले आहे, असे संगीता पाटील, सुरेश पाटील यांनी सांगितले. यावेळी सरदार शेळके, शिवाजी सावंत, अनिल आलदार उपस्थित होते.