शासनामुळे आटपाडीत कृत्रिम दुष्काळ

By admin | Published: June 9, 2016 11:37 PM2016-06-09T23:37:38+5:302016-06-10T00:18:01+5:30

जयंत पाटील : टेंभू योजनेचे पाणी येऊनही टंचाई, तालुक्यात ठिकठिकाणी बैठका

Artificial drought in the atpapada due to the government | शासनामुळे आटपाडीत कृत्रिम दुष्काळ

शासनामुळे आटपाडीत कृत्रिम दुष्काळ

Next

आटपाडी : आतापर्यंत इथे निसर्गाचा दुष्काळ होता, पण टेंभूचे पाणी येऊनही या भागात दुष्काळ आहे, हे सरकारच्या चुकीच्या, अदूरदर्शीपणाच्या धोरणांमुळे पडलेला कृत्रिम दुष्काळ आहे. अशा दुष्काळाला आटपाडी तालुक्याला तोंड द्यावे लागत आहे, अशी टीका माजी मंत्री जयंतराव पाटील यांनी येथे केली. दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आ. जयंत पाटील यांनी बुधवारी खरसुंडी, दिघंची आणि आटपाडीत बैठक घेतली. येथील श्री कल्लेश्वर देवस्थानच्या सभागृहात बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी पाटील म्हणाले, टेंभू योजनेचे पाणी शेतकऱ्यांनी पैसे भरूनही आटपाडी तालुक्यात मिळाले नाही. सरकारी यंत्रणा कुचकामी ठरली. जाणीवपूर्वक पाण्यापासून दूर ठेवणाऱ्यांविरुद्ध संघटित व्हायला पाहिजे. विहित नमुन्यात अर्ज करूनही पाण्यासाठी अडवणूक केली जात असेल, त्यांना आपला नमुना दाखविण्याची गरज आहे. जिल्ह्यातील राष्ट्रवादी तुमच्या पाठीशी आहे.
कृष्णा नदी पावसाळ्यात भरून वाहते तेव्हा शासनाने शेतकऱ्यांनी पैसे भरण्याची वाट न पाहता आटपाडी तालुक्यातील तलाव पाण्याने भरून द्यावेत. टेंभू योजना पूर्ण सक्षमतेने सुरू करून शेतकऱ्यांना पाण्याची आवर्तने ठरवून दिली पाहिजेत.
माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख यांनी यावेळी आक्रमक भूमिका घेतली. ते म्हणाले, ज्यांनी आर. आर. पाटील, जयंतराव यांच्याकडून कामे करून घेतली, आता ते इथं नाहीत. निवडणुकीत हार-जीत होत असते. टेंभू योजनेच्या पाण्यासाठी ५७ लाख ५७ हजार भरले. पण ६० दिवस पाणी दिले नाही. जेवढे पैसे भरले तेवढेही पाणी दिले नाही. आमदार बाबर यांचे नाव न घेता ते म्हणाले, तुमची काय ताकद आहे ती बघितली. आता पुन्हा पुढच्यावेळी पाणी सोडताना अडवून दाखवा. जयंतराव, आमच्या पाठीशी राहा. त्यांचा कार्यक्रम केल्याशिवाय रहात नाही. आॅगस्टमध्ये सगळे तलाव भरण्यासाठी आपल्याला आंदोलन करावे लागेल.
राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष हणमंतराव देशमुख म्हणाले, पाटबंधारे विभागाचे अभियंता आर. एस. पवार हे काम कमी आणि राजकारण जास्त करत आहेत. आता यापुढे तक्रारी सांगण्यापेक्षा ते कार्यालयात असले तर बाहेर आणि बाहेर असले तर कार्यालयात त्यांना जाऊ देणार नाही. संघर्ष करू, तीव्र आंदोलने करू, याशिवाय आपल्याला न्याय मिळणार नाही.
यावेळी राष्ट्रवादी युवकचे तालुकाध्यक्ष ऋषिकेश देशमुख, महिला आघाडीप्रमुख सौ. सुमन नागणे, आटपाडी पंचायत समिती सभापती सौ. सुमन देशमुख, उपसभापती भागवत माळी, जयंत नेवासकर, विठ्ठल पुकळे, राजू विभूते, श्रीरंग कदम यांची भाषणे झाली.
कार्यक्रमास राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष उदयसिंह देशमुख, हर्षवर्धन देशमुख, माजी सभापती सौ. विद्या देशपांडे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजित पाटील, सभापती सौ. सुमन मोटे, पंचायत समिती सदस्या सौ. सुनीता गायकवाड, बळी मोरे, आटपाडीच्या सरपंच सौ. स्वाती सागर यांच्यासह मोठया संख्र्येन कार्यकर्ते , नागरिक व ग्रामस्थ उपस्थित होते. (वार्ताहर)

नगरपालिकेला आमदारांचा खोडा!
आटपाडी नगरपालिकेचा निर्णय शासनाने अद्याप प्रलंबित ठेवला आहे. यावर राजेंद्रअण्णा देशमुख यांनी आ. बाबर यांचे नाव न घेता नुसता विधानसभेत प्रश्न विचारला म्हणजे काम संपते का? पुढे काय झाले? आटपाडीत नगरपंचायत झाली, तर काय फरक पडतो, पण त्यांचा नगरपालिका करण्यासाठी जिल्हा परिषदेला आणि पंचायत समितीला उमेदवार मिळणार नाही म्हणून ही धडपड आहे, असा आरोप केला. युवक राष्ट्रवादीचे ऋषिकेश देशमुख आणि राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष हणमंतराव देशमुख यांनीही असा आरोप केला.

Web Title: Artificial drought in the atpapada due to the government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.