सराफाकडील सव्वा नऊ लाखांचे दागिने चोरणाऱ्या कारागिरास अटक
By शरद जाधव | Published: November 19, 2022 08:57 PM2022-11-19T20:57:06+5:302022-11-19T20:58:03+5:30
शहर पोलिसांची नांदेडमध्ये कारवाई
सांगली : शहरातील गणपती पेठ परिसरात सराफी दुकानातून सव्वानऊ लाख रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांवर हात मारणाऱ्या बंगाली कारागिरास पोलिसांनी अटक केली. उस्मानअली अब्बास अलीमंडल (वय २३, रा. हुगाली पन्नडुवा, पश्चिम बंगाल) असे संशयिताचे नाव असून, त्याच्याकडून १८५ ग्रॅम वजनाचे नऊ लाख २५ हजार रुपये किमतीचे सोने जप्त करण्यात आले आहे. नांदेड येथे जाऊन सांगली शहर पोलिसांनी ही कारवाई केली.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फिर्यादी अजय जाधव यांचे गणपती पेठ येथे सोन्याचे दागिने निर्मितीचे दुकान आहे. या दुकानात उस्मानअली अलीमंडल कामास होता. मंगळवार, दि. १५ रोजी संशयिताने दुकानातील ड्रॉवरमधील १८५ ग्रॅम सोन्याचे दागिने चोरून पलायन केले. चोरीचा प्रकार लक्षात येताच जाधव यांनी पोलिसांत फिर्याद दाखल केली होती.
पोलिसांनी संशयिताचे मोबाईल लोकेशन तपासले असता, तो नांदेड शहरात असल्याचे माहिती मिळाली. त्याद्वारे शहर पोलिसांनी नांदेडमध्ये जात त्याला ताब्यात घेतले. यावेळी त्याच्याकडून दागिने आणि सोन्याचे तुकडे असे एकूण १८५ ग्रॅम सोने मिळून आले. ऐवज त्याने सांगलीतील जाधव यांच्या सराफी दुकानातून चोरल्याची कबुली दिली. यानंतर त्याच्याकडून एकूण ९ लाख २५ हजार रुपये किमतीचे १८५ ग्रॅम सोने जप्त करून अटक करण्यात आली.
नांदेडमध्ये जाऊन कारवाई
शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने संशयित हा नांदेडमध्ये आहे याची माहिती मिळाल्यानंतर दिवसभर तिथे शहरात त्याचा शोध घेतला. त्यानंतर त्याला ताब्यात घेतल्यावर चौकशीत त्याने चोरीची कबुली दिली.