वेरळा संस्थेचे संस्थापक अरुण चव्हाण यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 04:41 PM2021-05-24T16:41:50+5:302021-05-24T16:43:03+5:30
Sangli News : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि वेरळा संस्थेचे संस्थापक अरुण दत्ताजीराव चव्हाण (वय ८९) यांचे शनिवारी रात्री ह्रदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी यशोदा, मुली डॉ. जाई व वसुंधरा असा परिवार आहे.
सांगली : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि वेरळा संस्थेचे संस्थापक अरुण दत्ताजीराव चव्हाण (वय ८९) यांचे शनिवारी रात्री ह्रदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी यशोदा, मुली डॉ. जाई व वसुंधरा असा परिवार आहे.
कवठेपिरानमध्ये जन्मलेल्या अरुण चव्हाण यांनी शिक्षणानंतर काही काळ अौरंगाबादला डॉ. बाबाबासाहेब आंबेडकर विद्यापीठात व कोल्हापुरात शिवाजी विद्यापीठात असिस्ट्न्ट रजिस्ट्रार म्हणून काम केले होते. त्यानंतर सांगलीत विलिंग्डन महाविद्यालयात इंग्रजीचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले.
यादरम्यान, खानापूर तालुक्यातील दुष्काळी शेतीशी त्यांचा संपर्क आला. पावसाअभावी नुकसानीची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी काहीतरी करण्याच्या प्रेरणेतून वेरळा विकास संस्थेची स्थापना केली. स्वयंसेवी संस्थेची संकल्पना फारशी अस्तित्वात नसल्याच्या काळात म्हणजे २ ऑक्टोबर १९६९ रोजी वेरळा संस्थेचा शेतकऱ्यांच्या विकासासाठी प्रवास सुरु झाला. या प्रवासात त्यांना सदाभाऊ गुळवणी, भगवानराव सव्वाशे, धोंडिराम माळी, रामतात्या जाधव यांची साथ मिळाली.
संस्थेने शेतकऱ्यांसाठी ३७ नाला बंधारे, दोन पाझर तलाव, १०४ एकर क्षेत्रात वनीकरण, रस्ते, शाळा अशी कामे उभी केली. देशिंग व खरशिंग परिसरात वनीकरण, कवठेपिरानला क्षारपड विकास असे प्रकल्प राबवले. शालाबाह्य मुलांसाठी घरबांधणी प्रशिक्षण केंद्र, महिला व मुलींसाठी वेगवेगळे प्रकल्प, आरोग्यासाठीची कामे चव्हाण यांनी संस्थेच्या माध्यमातून केली आहेत.
संस्थेच्या कामांमुळे आळसंद, वाझर, कमळापूर, खानापूर आदी भागात हिरवाई फुलली आहे. कृषीभूषण प्र. शं. ठाकूर यांचेही मार्गदर्शन त्यांना लाभले.