झेडपीच्या मालमत्तांवर मालकीचे फलक लावणार- अरुण राजमाने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2018 11:24 PM2018-06-22T23:24:02+5:302018-06-22T23:24:45+5:30
जिल्हा परिषदेच्या मालमत्तांवर अनेकदा अतिक्रमण होते. त्यानंतर त्यावर कोर्टकचेऱ्यासारखे प्रकार करावे लागतात.
सांगली : जिल्हा परिषदेच्या मालमत्तांवर अनेकदा अतिक्रमण होते. त्यानंतर त्यावर कोर्टकचेऱ्यासारखे प्रकार करावे लागतात. त्यामुळे ज्या ज्या ठिकाणी जि.प.च्या मालमत्ता आहेत, त्या ठिकाणी मालकीचे फलक लावण्याच्या सूचना बांधकाम सभापती अरूण राजमाने यांनी शुक्रवारी दिल्या.
सभापती अरूण राजमाने यांच्या अध्यक्षतेखाली बांधकाम समितीची सभा झाली. यावेळी सदस्य अरूण बालटे, संजीव पाटील, सरदार पाटील, जग्गनाथ माळी, जयश्री पाटील, आशा पाटील आदी सदस्य उपस्थित होते. सचिव म्हणून जे. वाय. माळी यांनी काम पाहिले.
जिल्हा परिषदेच्या मालमत्तांना नोंदणी क्रमांक देणे आवश्यक असून जि. प.च्या मालकीच्या मालमत्तांची तालुकानिहाय सूची तयार करण्याचे आदेश सर्व तालुक्यातील शाखा अभियंत्यांना देण्यात आले.तसेच दुकान गाळे धारकांकडील प्रलंबित भाडेवसुलीबाबत चर्चा झाली. दलित वस्तीबाबत परिपूर्ण प्रस्ताव नसल्याने त्यांना मान्यता मिळू शकली नव्हती. मात्र नव्याने ३० कोटीचा निधी मिळाल्याने जास्तीत जास्त कामे मंजूर करून घेण्यासाठी प्रथम कामांचे प्रस्ताव सादर करावेत, असे आदेश सर्व उपअभियंत्यांना देण्यात आले. तसेच कणेगाव (ता. वाळवा) येथील स्वागत कमानीच्या बांधकामास मंजुरीही देण्यात आली.
शाळांच्या दुरूस्तीसाठी निधीची प्रतीक्षा
१५ जून रोजी जिल्हा परिषदेच्या शाळा सुरू झाल्या आहेत. सध्या पावसाळा सुरू झाला आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर शाळा दुरूस्तीची कामे प्रलंबित आहेत. ती तात्काळ पूर्ण करावीत, त्यासाठी एखाद्या अपघाताची वाट बघणे चुकीचे ठरणार असल्याचे सदस्यांनी सांगितले. त्यावर इमारत दुरूस्तीसाठी लवकरच नियोजनकडून निधी उपलब्ध होणार आहे. तो निधी मिळताच ही कामे प्रामुख्याने केली जातील, असे सभापती राजमाने यांनी सांगितले.