माणसामधली सृजनशक्ती असेपर्यंत साहित्यही असणार, ज्येष्ठ साहित्यिका डॉ. तारा भवाळकरांनी व्यक्त केला विश्वास

By श्रीनिवास नागे | Published: February 24, 2023 06:15 PM2023-02-24T18:15:22+5:302023-02-24T18:19:41+5:30

मिरजेत १७वे कामगार साहित्य संमेलन

As long as there is creativity in man, there will be literature. Senior writer Dr. Tara Bhavalkar expressed faith | माणसामधली सृजनशक्ती असेपर्यंत साहित्यही असणार, ज्येष्ठ साहित्यिका डॉ. तारा भवाळकरांनी व्यक्त केला विश्वास

माणसामधली सृजनशक्ती असेपर्यंत साहित्यही असणार, ज्येष्ठ साहित्यिका डॉ. तारा भवाळकरांनी व्यक्त केला विश्वास

googlenewsNext

मिरज : यंत्र असो, तंत्र असो, कृत्रिम बुध्दिमत्ता असो, तिचा निर्माता, सृजनात्मा माणूसच आहे. कृत्रिम बुध्दीलाही माणसांनीच निर्माण केले आहे. माणसामधली सृजनशक्ती आहे, तोपर्यंत त्याची कृतीही असणार आहे, त्याची कलाही असणार आहे, त्याचे साहित्यही असणार आहे आणि माणूसही असणार आहे, असा ‍विश्वास सतराव्या कामगार साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून ज्येष्ठ साहित्यिका डॉ. तारा भवाळकर यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळामार्फत मिरजेत लोकशाहीर अण्णा भाऊ साठे साहित्यनगरी बालगंधर्व नाट्यमंदिरात आयोजित १७व्या कामगार साहित्य संमेलनाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्य विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष डॉ. राजा दीक्षित यांच्या हस्ते झाले. यावेळी संमेलनाच्या अध्यक्षा भवाळकर, कामगारमंत्री सुरेश खाडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

भवाळकर म्हणाल्या, नवभान आलेला कामगार साहित्यिक, भांडवलशाहीचे नवे अर्थभान घेऊन लिहू-वाचू लागला. मोर्चांमुळे कामगार चळवळीचे अस्तित्व समाजाला जाणवू लागले. त्याचा आविष्कार त्याच्या लेखनातून होऊ लागला. नवयुगाच्या विविध चळवळींतून कामगार चळवळ पुढे येत गेली. त्या त्या गटातल्या साहित्याची निर्मिती त्यातून झाली.

साहित्य, कामगारांच्या साहित्यातून श्रमाचा हुंकार बाहेर पडतो. गिरण्या कारखान्यातल्या एकाच प्रकारच्या अनुभवी संघभावनेने कामगाराला नवी दृष्टी दिली व नवं भान दिलं. नवी अस्मिता, अभिमान आणि विश्वास दिला. यंत्रयुगातल्या एकानुभवी समूहाला कष्टाचंही सामूहिक एकीकरण झालं. नवयुगाचं अर्थकारण मालक - मजूर संबंध, संघर्ष, मजुरांचे हक्क आदी बाबींमधून नवभान आलेला कामगारवर्ग निर्माण झाला.

बुद्धी व श्रम ही दोन्ही बले जेव्हा एकत्र येतात तेव्हा नवनिर्मिती होते. मनगट, मन आणि बुद्धी एकत्र आल्याशिवाय प्रगती नाही म्हणूनच श्रमातून सौंदर्य निर्माण करणाऱ्या कामगारांना समाजात आदराचे स्थान दिले पाहिजे, असे प्रतिपादन संमेलनाचे उद्घाटक डॉ. राजा दीक्षित यांनी केले.

कामगार विभागाच्या प्रधान सचिव विनिता वेद सिंगल म्हणाल्या, कामगार कल्याण मंडळामार्फत कामगारांच्या कल्याणासाठी अनेक उपक्रम राबविले जात आहेत. कामगारांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी नाट्य स्पर्धा आयोजित केल्या जात असून, कबड्डीसारख्या राज्यस्तरीय स्पर्धाही घेतल्या जात आहेत.

अभिनेत्री रोहिणी कुडेकर, संबळवादक गौरी वायचळ, अभिनेता अजितकुमार कोष्टी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी महापौर दिग्विजय सूर्यवंशी, अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ नाटककार प्रेमानंद गज्वी, कामगार विभागाच्या प्रधान सचिव विनिता वेद सिंगल, उपसचिव दादासाहेब खताळ, महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे कल्याण आयुक्त रविराज इळवे, दक्षिण महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष भीमराव धुळुबुळू उपस्थित होते.

Web Title: As long as there is creativity in man, there will be literature. Senior writer Dr. Tara Bhavalkar expressed faith

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Sangliसांगली