राज्य शासनाकडून सांगली जिल्ह्यातील तब्बल १३ शेतकऱ्यांनी पटकाविला पुरस्कार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2024 06:32 PM2024-02-24T18:32:39+5:302024-02-24T18:32:39+5:30
तीन वर्षांतील पुरस्कारांची घोषणा : शेतीनिष्ठ, कृषिभूषण, शेतीमित्र, युवा शेतकरी, जिजामाता कृषिभूषण, उद्यान पंडित पुरस्कारांचा समावेश
सांगली : शेती आणि शेतीपूरक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या शेतकऱ्यांना राज्य शासनाच्या कृषी विभागाकडून विविध पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. २०२० ते २०२२ या तीन वर्षांच्या विविध पुरस्कारांची घोषणा शासनाने शुक्रवारी केली. यामध्ये शेतीनिष्ठ, कृषिभूषण, शेतीमित्र, युवा शेतकरी, वसंतराव नाईक शेतीनिष्ठ, उद्यान पंडित आणि जिजामाता कृषिभूषण असे तब्बल १३ पुरस्कार जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळाले आहेत. या शेतकऱ्यांचा शासनाकडून सन्मान करण्यात येणार आहे.
राज्य शासनाच्या वतीने कृषी, कृषी संलग्न क्षेत्र तसेच फलोत्पादनामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांना विविध कृषी पुरस्कार देण्यात येतात. यामध्ये डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार, वसंतराव नाईक कृषिभूषण, जिजामाता कृषिभूषण, कृषिभूषण (सेंद्रिय शेती), वसंतराव नाईक शेतीमित्र, वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी, उद्यान पंडित, पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे-पाटील, कृषी सेवारत्न असे पुरस्कार देण्यात येत आहेत. यामध्ये जिल्ह्यातील सर्वाधिक १३ पुरस्कार शेतकऱ्यांनी पटकावले आहेत.
या शेतकऱ्यांचा होणार गौरव
२०२२चा वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार बसवराज शिवपुत्र (शिवाण्णा) कुंभार (संख ता. जत), युवा शेतकरी पुरस्कार धैर्यशील रणधीर पाटील (साखराळे, ता. वाळवा), वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्कार अमोल आनंदराव लकेसर ( दुधारी, ता. वाळवा), २०२१ चा वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार जयकर राजाराम माने (सावंतपूर, ता. पलूस), उद्यानपंडित पुरस्कार महेंद्र आनंदराव कदम (विटा, ता. खानापूर), जिजामाता कृषिभूषण पुरस्कार सुलोचना मोहन कदम (कुंडलवाडी, ता. वाळवा), वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्कार तात्यासाहेब रामचंद्र नागावे (खटाव, ता. पलूस),
२०२० चा वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार प्रमोद अण्णासो पाटील (डिग्रज, ता. मिरज), उद्यानपंडित पुरस्कार रुपेश बाळू गायकवाड (शेटफळे, ता. आटपाडी), युवा शेतकरी पुरस्कार किशोर दीपकराव बाबर (गार्डी, ता. खानापूर), वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार विजय बिरजाप्पा रुपनूर (येळवी, ता. जत), जिजामाता कृषिभूषण पुरस्कार मधुमती दयाधन सोनवणे (मालगाव, ता. मिरज), वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्कार प्रशांत भानुदास पाटील (राडेवाडी-अंकलखोप, ता. पलूस).