सांगलीत तब्बल ७० टन फटाके, फुले, साहित्याचा कचरा जमा; महापालिकेने रात्रीत केली स्वच्छता
By शीतल पाटील | Published: November 13, 2023 04:48 PM2023-11-13T16:48:30+5:302023-11-13T16:48:57+5:30
सांगली : लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सांगली , मिरज आणि कुपवाडकरांनी तब्बल ७० टन कचरा केला. फटाके, फुले, लक्ष्मीपूजन साहित्यासह खाद्यपदार्थांचा ...
सांगली : लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सांगली, मिरज आणि कुपवाडकरांनी तब्बल ७० टन कचरा केला. फटाके, फुले, लक्ष्मीपूजन साहित्यासह खाद्यपदार्थांचा हा कचरा महापालिकेच्या आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी रात्रीत उचलून कर्तव्याचे दर्शन घडविले. त्यामुळे सोमवारी सकाळी मुख्य बाजारपेठेतील रस्ते चकाचक झाले होते. रविवारी दिवसभरात महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी २८१ टन कचरा संकलन केले होते.
महापालिका आयुक्त तथा प्रशासक सुनील पवार यांनी यंदा फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याचे आवाहन केले होते. पण त्याकडे नागरिकांनी दुर्लक्ष केल्याचेच दिसून आले. लक्ष्मीपूजनासाठी ठिकठिकाणी केळीचे खुंट, नारळाच्या झावळ्या विक्रेत्यांची गर्दी होती. रात्री बहुतांश विक्रेत्यांनी झावळ्या, खुंट तशाच टाकल्या होत्या. शहरातील मुख्य बाजारपेठेत लक्ष्मीपूजन साहित्य विक्रेत्यांचे स्ट़ॉल लागले होते. तसेच किरकोळ कापड विक्रेत्यांनी रस्त्यावर व्यवसाय मांडला होता. रविवारी रात्री विक्रेते त्यांच्याकडील कचरा रस्त्यावर सोडून निघून गेले होते. लक्ष्मीपूजनानंतर शहरात मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतषबाजी झाली. टाके आणि फुलांचा कचरा रस्त्यावर पडून होता.
प्रशासक पवार यांनी सांगली, मिरज आणि कुपवाड या तिन्ही शहरांतील बाजारपेठेतील कचरा रात्रीत संकलन करण्यासाठी विशेष पथकाद्वारे नियोजन केले. सांगलीत वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक, तीन स्वच्छता निरीक्षक, चार मुकादम आणि ५० कर्मचाऱ्यांनी रात्री बारा ते सकाळी पाच वाजेपर्यंत मारुती रोड, कापड पेठ, गणपती पेठ, बालाजी चौक, हरभट रोड, मित्र मंडळ चौक या परिसरातील कचरा उचलला. मिरज आणि कुपवाडमध्ये ५० ते ७० कर्मचारी रात्रीच्या वेळी स्वच्छता मोहिमेवर होते. रविवारी रात्री ते सोमवारी सकाळपर्यंत महापालिकेने २८१ टन कचरा संकलन केले होते. यात ७० टन कचरा हा फटाके, फुले, दिवाळी साहित्यांचा होता.