आमदार बाबर गटाशी बिनसल्याने खासदारांची आटपाडीत साखर पेरणी, सांगलीत लोकसभा निवडणुकीसाठी जमवाजमव
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2023 05:35 PM2023-01-31T17:35:20+5:302023-01-31T17:36:59+5:30
काही दिवसांपूर्वीच खा. पाटील व आ. पडळकर यांच्यामध्ये मनोमिलन
लक्ष्मण सरगर
आटपाडी : आमदार अनिल बाबर गटाशी बिनसल्याने खासदार संजय पाटील यांनी तालुक्यातील महिलांसाठी आयोजित हळदी-कुंकू कार्यक्रमाच्या माध्यमातून तालुक्यात साखर पेरणी सुरू केली आहे.
खा. पाटील, आ. गोपीचंद पडळकर, राजेंद्रअण्णा देशमुख यांच्या घरातील महिलांची उपस्थिती होती. आटपाडीत आयोजित कार्यक्रमास तालुक्यातील विविध गावांतून महिलांनी गर्दी केली होती. लोकसभेच्या निवडणुका जवळ येत असल्याने दहा वर्षांत प्रथमच खासदार पाटील यांच्या कुटुंबीयांनी मतदारसंघात महिलांसाठी कार्यक्रम आयोजित केला होता.
गत लोकसभा निवडणुकीमध्ये पडळकर हे पाटील यांच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीकडून उभे होते. त्यावेळी आमदार अनिल बाबर व तानाजीराव पाटील यांनी युती धर्म पाळत पाटील यांना सहकार्य केले होते. राजेंद्रआण्णा देशमुख, अमरसिंह देशमुख यांनीही पाटील यांना मदत केली होती. आता पडळकर यांनी भाजपात प्रवेश करून विधान परिषदेत प्रवेश मिळविला आहे. काही दिवसांपूर्वीच खा. पाटील व आ. पडळकर यांच्यामध्ये मनोमिलन झाले.
दुसरीकडे खानापूर विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेच्या शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर व खासदार पाटील यांचे बिनसले आहे. दोघांनी एकमेकांना बघून घेण्याची भाषा वापरली होती. मागीलवेळी विरोधात असणारे पडळकर सध्या भाजपवासी असून, पाटील यांना जमेची बाजू असली तरी मागीलवेळी जवळ असणारे बाबर व पाटील यांच्याशी असलेला दुरावा महागात पडू शकतो. ही पोकळी भरून काढण्यासाठी हळदी-कुंकू कार्यक्रमातून साखर पेरणी केली जात आहे.