भावाचा नादच खुळा! भाऊ उपसरपंच झाला पठ्ठ्याने हेलिकॉप्टरने उधळली फुले
By हणमंत पाटील | Published: December 2, 2023 02:37 PM2023-12-02T14:37:02+5:302023-12-02T15:38:19+5:30
गत महिन्यामध्ये ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये साहेबराव खिलारी करगणी ग्रामपंचायतसाठी सदस्य म्हणून निवडून आले.
आटपाडी : भाऊ गावचा उपसरपंच झाल्याने धाकट्या भावाचा आनंद गगनात मावेनासा झाला. २० वर्षांपूर्वी केलेला ‘पण’ लक्षात होता. त्यानुसार थेट हेलिकॉप्टरमधून गावाला रपेट मारत ग्रामदैवतेला प्रदक्षिणा घालत फुले उधळून आनंद व्यक्त केला. आटपाडी तालुक्यातील करगणी गावातील या जल्लोषाची राजकीय वर्तुळात सर्वत्र चर्चा रंगली आहे.
साहेबराव खिलारी यांची करगणी गावच्या उपसरपंचपदी निवड झाली. धाकटा भाऊ अंकुश खिलारी याला खूप आनंद झाला. आपल्या कुटुंबीयांनी गावच्या उपसरपंचपदाचे पाहिलेले कित्येक वर्षांपासूनचे स्वप्न पूर्ण झाल्याचा आनंद झाला. हा आनंदा अनोख्या पद्धतीने साजरा करण्याचे ठरवले. त्यातूनच थेट गावाला हेलिकॉप्टरमधून फेरफटका मारून आनंद व्यक्त केला आहे. गावाला फेरफटका मारत ग्रामदैवत लखमेश्वर ऊर्फ राम मंदिराच्या शिखराला प्रदक्षिणा घातली.
गत महिन्यामध्ये ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये साहेबराव खिलारी करगणी ग्रामपंचायतसाठी सदस्य म्हणून निवडून आले. भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसच्या संयुक्त पॅनलने करगणी ग्रामपंचायतीमध्ये सत्तांतर घडवले. दोन दिवसांपूर्वी उपसरपंचपदाची निवडणूक झाली. यामध्ये राष्ट्रवादीच्या खिलारी यांची निवड झाली. या निवडीचा भाऊ अंकुश याला मोठा आनंद झाला. त्यातूनच चक्क हेलिकॉप्टरमधून रपेट करत बंधुप्रेम दाखवले.
आटपाडी : भाऊ गावचा उपसरपंच झाल्याने धाकट्या भावाचा आनंद गगनात मावेनासा झाला. २० वर्षांपूर्वी केलेला ‘पण’ लक्षात होता. त्यानुसार थेट हेलिकॉप्टरमधून गावाला रपेट मारत ग्रामदैवतेला प्रदक्षिणा घालत फुले उधळून आनंद व्यक्त केला. आटपाडी तालुक्यातील करगणी गावातील या जल्लोषाची राजकीय… pic.twitter.com/x4T5NKU5Mt
— Lokmat (@lokmat) December 2, 2023
२० वर्षांपूर्वी केला पण ...
खरे तर २० वर्षांपूर्वी अंकुश खिलारी यांचे चुलते दुर्योधन खिलारी यांची राजकीय डावपेचातून पदाची संधी हुकली होती. त्यावेळी अंकुश यांनी कुटुंबातील कोणताही सदस्य गावचा सरपंच, उपसरपंच झाल्यास संपूर्ण गावाला व ग्रामदैवत श्रीराम मंदिराला हेलिकॉप्टरने प्रदक्षिणा घालण्याचा पण केला होता. तो भावाच्या उपसरपंचपदानंतर पूर्ण केला. त्यासाठी लाखो रुपये खर्चही केले.
निवडणूक आणि फेरफटका चर्चेत
करगणी ग्रामपंचायत ही तालुक्यातील मोठी ग्रामपंचायत आहे. येथील निवडणुकीकडे अनेकांचे लक्ष लागले. अनेकांनी पाण्यासारखा पैसा ओतला. त्यामुळे निवडणुकीची चर्चा रंगली होती. त्यानंतर आता हेलिकॉप्टरमधून फेरफटका मारल्याची चर्चा रंगली आहे.