पगार वेळेवर होत नसल्याने उचले टोकाचे पाऊल, सांगली जिल्ह्यातील एसटी चालकाने संपवले जीवन
By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2023 11:46 AM2023-02-17T11:46:07+5:302023-02-17T11:46:28+5:30
गावामध्ये काही काळ तणाव
शिरढोण : पगार वेळेवर हाेत नसल्याने आर्थिक चणचणीमुळे वैफल्यातून कवठेमहांकाळ एसटी आगारात कार्यरत भीमराव रावसाहेब सूर्यवंशी (वय ५०, रा. शिरढोण, ता. कवठेमहांकाळ) या बसचालकाने शिरढाेण येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. गुरुवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला.
गेल्या दाेन वर्षांपासून पगार नियमित हाेत नसल्याने एसटी कर्मचाऱ्यांची आर्थिक काेंडी झाली आहे. गेली २० ते २५ वर्षे कवठेमहांकाळ बस आगारात वाहनचालक पदावर कार्यरत असलेले सूर्यवंशी हेदेखील माेठ्या आर्थिक अडचणीत हाेते. घराची सर्व जबाबदारी भीमराव सूर्यवंशी यांच्यावरच होती. गेल्या दाेन वर्षांत वेळेवर पगार होत नसल्याने ते वैफल्यग्रस्त हाेते. काही दिवसांपूर्वी पत्नीचे सोने मोडून त्यांनी गावातील काही देण्या-घेण्याचे व्यवहार मिटवले होते.
यानंतरही आर्थिक चणचण असल्याने ते जानेवारी महिन्याचा पगार जमा होण्याच्या प्रतीक्षेत हाेते. मात्र, बुधवारी १५ तारीख उजाडली तरीही पगार न झाल्याने ते तणावाखाली हाेते. बुधवारी रात्री उशिरा त्यांनी कुटुंबासमवेत जेवण केले. रात्री घरातील सर्वजण झाेपी गेल्यानंतर स्वयंपाकघरातील तुळईला त्यांनी गळफास घेतला. सकाळी हा प्रकार कुटुंबीयांच्या निदर्शनास आला.
घटनेची माहिती मिळताच कवठेमहांकाळ पाेलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. कवठेमहांकाळ बस आगारातही काही काळ बंदोबस्त ठेवण्यात आला होता. उपजिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणी करुन मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला.
गावात तणाव
सूर्यवंशी यांनी आत्महत्या केल्याची घटना समजताच एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांसह तालुका आगार प्रमुख महेश जाधव यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. वेळेवर पगार होत नसल्याने आर्थिक चणचणीतून सूर्यवंशी यांनी आत्महत्या केल्याच्या चर्चेनंतर तालुक्यातील एसटी कर्मचाऱ्यांसह नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती. विविध एसटी कर्मचारी संघटनांचे पदाधिकारीही मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी गावामध्ये काही काळ तणाव निर्माण झाला होता.