भाव नसल्याने भेंडीच्या पिकात घातली मेंढरे, सांगलीतील कुरळप येथील शेतकऱ्याची हतबलता
By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2023 07:12 PM2023-07-07T19:12:15+5:302023-07-07T19:12:32+5:30
पस्तीस गुंठे क्षेत्रामध्ये घेतले होते भेंडीचे पीक
कुरळप : कुरळप (ता. वाळवा) येथील भगवान देवकर यांनी पस्तीस गुंठे क्षेत्रामध्ये भेंडीचे पीक घेतले. मात्र, दर नसल्याने पीक साेडून देण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. सुमारे साठ हजार रुपये खर्च करून घेतलेला प्लॉट अखेर देवकर यांनी मेंढरांसाठी साेडून दिला.
महागड्या औषधांची फवारणी करून, लागवडी वापरून तसेच पाण्याचे योग्य नियोजन करून देवकर यांनी भेंडीचा प्लॉट घेतला हाेता. सुमारे साठ हजार रुपये यासाठी खर्च केले हाेते. मात्र, सध्या भेंडीला दर नसल्याने पीक काढून टाकण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. ३५ गुंठे क्षेत्रात दोन ते तीन लाखांचे उत्पन्न अपेक्षित होते. सध्या रासायनिक खते व लागवडीचे दर गगनाला भिडले असल्याने शेती करताना शेतकऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
त्यातच भेंडीला प्रति किलो सात ते १५ रुपयांपर्यंतच दर मिळत आहे. यामध्ये दलाली १० टक्के, वाहतूक पर नगास २५ रुपये, हमाली चार रुपये, तोलाई चार रुपये, अशी कपात होत असल्याने शेतकऱ्यांना पदरमोड करावी लागत आहे. यामुळे बहरात आलेले भेंडीचे पीक देवकर यांनी मेंढरे सोडून काढून टाकले आहे. यामुळे देवकर यांना तीन लाखांचे नुकसान सोसावे लागणार आहे.