क्रीडांगण नसल्याने सांगली महापालिकेच्या दारात मुलांनी खेळले क्रिकेट

By अविनाश कोळी | Published: June 11, 2024 05:15 PM2024-06-11T17:15:54+5:302024-06-11T17:16:23+5:30

खासदार, आमदारांच्या नावे झळकविले फलक

As there was no playground the children played cricket at the door of Sangli Municipal Corporation | क्रीडांगण नसल्याने सांगली महापालिकेच्या दारात मुलांनी खेळले क्रिकेट

क्रीडांगण नसल्याने सांगली महापालिकेच्या दारात मुलांनी खेळले क्रिकेट

सांगली : शामरावनगर परिसरात एकही क्रिडांगण नसल्याने येथील शाळकरी मुलांनी मंगळवारी महापालिकेच्या दारात क्रिकेट खेळून अनोखे आंदोलन केले. खासदार व आमदारांनी क्रीडांगणावर केलेल्या फलंदाजीची छायाचित्रे झळकावत ‘आम्ही कुठे खेळायला जायचे?’ असा फलक झळकावत या प्रश्नाकडे लक्ष वेधले.

शामरावनगर येथील सामाजिक कार्यकर्ते संदीप दळवी यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले होते. सांगलीतील महापालिकेच्या दारात मुलांनी घोषणाबाजी केली. ‘आयुक्तकाका क्रीडांगण द्या’, ‘सुविधा नाहीत, क्रिडांगण तरी द्या’, ‘आम्ही खेळायचे तरी कुठे’, असे सवाल करणारे फलक झळकविण्यात आले. त्यानंतर क्रिकेट व कबड्डीचा खेळही महापालिकेच्या दारात मांडला. महापालिकेलाच क्रीडांगणाचे स्वरुप देत अनोखे आंदोलन करण्यात आले.

दळवी यांनी निवेदनात म्हटले आहे की, गेली कित्येक वर्षे शामरावनगर हा भाग समस्यांनी व्यापलेला आहे. या भागात मोकळे प्लॉट व महापालिकेचे खुले भूखंड आहेत. यामध्ये पावसाचे पाणी व सांडपाणी साचून दुर्गंधी निर्माण झाली आहे. हे चित्र बारा महिने शामरावनगरमध्ये पहावयास मिळते. त्यामुळे लहान मुलांना खेळण्यासाठी कोणतेच क्रीडांगण या भागात नाही.
मागील दोन आयुक्तांना आम्ही वारंवार निवेदने देत आंदोलनेही केली. तरीही महापालिका प्रशासन व मागील नगरसेवक, आमदार, खासदार यांनी या भागासाठी तसेच येथील लहान मुलांना व वृद्धांना उपयोग होईल असा खुला भूखंड विकसित केला नाही. येथील लहान मुलांना रस्त्यावर खेळावे लागत आहे. वाहनांची संख्या वाढलेली आहे. त्यामुळे लहान मुलांना रस्त्यावर खेळताना धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे नागरी सुविधा नसल्या तरी किमान एखादे क्रिडांगण तरी या भागात विकसित करावे, अशी आमची मागणी आहे. नव्या आयुक्तांनी तरी याची दखल घ्यावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

सहाय्यक आयुक्तांनी निवेदन स्वीकारले. या आंदोलनात अर्णव कोळी, अबू शेख, अथर्व मोटे, आरुष दळवी, रुद्र कोरे, प्रथमेश धुमाळ, वेदराज दळवी, गोवर्धन भाट, जावेद मुल्ला, श्रावणी दळवी, रियान नदाफ, आराध्य सोनाळे, अक्षय कांबळे आदी मुलांनी सहभाग घेतला.

Web Title: As there was no playground the children played cricket at the door of Sangli Municipal Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Sangliसांगली