‘आशां’नी घडविले माणुसकीचे दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2018 11:15 PM2018-08-12T23:15:45+5:302018-08-12T23:15:50+5:30

'Asha' created human philosophy | ‘आशां’नी घडविले माणुसकीचे दर्शन

‘आशां’नी घडविले माणुसकीचे दर्शन

Next

प्रताप महाडिक ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कडेगाव : आशा स्वयंसेविका म्हणून काम करीत असताना, समाजाला आरोग्यसेवा देणाऱ्या महिला सामाजिक जाणिवेचाही विचार करतात. परंतु याच ‘आशा’ आपल्या ग्रुपमधील कोणाला किंवा कोणाच्या कुटुंबियांना दुखले-खुपल्याचे कळाले तर, त्यांची मने हेलावतात. कडेगाव तालुक्यातील आशा स्वयंसेविकांनी त्यांच्या सहकारी मैत्रिणीच्या डोळ्यातील अश्रू पाहिले आणि तिच्या मुलीच्या नर्सिंग (जीएनएम) कॉलेज व होस्टेल प्रवेशासाठी तात्काळ आर्थिक मदत करीत माणुसकीचे दर्शन घडविले.
कडेगाव येथे आशा स्वयंसेविका असलेल्या सुनीता चंद्रकांत वायदंडे यांच्या प्राजक्ता या मुलीला सातारा येथे शासकीय नर्सिंग महाविद्यालयात प्रवेश मिळाला आहे; परंतु मुलीचे महाविद्यालयाचे व होस्टेलचे प्रवेश शुल्क भरण्यासाठी पैसे नाहीत. या विवंचनेत असलेली ही माता कडेगाव पंचायत समितीमध्ये सभापती मंदाताई करांडे यांनी बोलाविलेल्या आशांच्या कामकाजाबाबतच्या बैठकीला गेली. बैठक संपताना सभापतींनी काही अडचणी असतील, तर सांगा, असा प्रश्न केला.
यावेळी सुनीता धाडसाने उठल्या, परंतु त्यांना अश्रू अनावर झाले. रडतच त्यांनी सांगितले की, माझी मुलगी प्राजक्ताला सातारा येथे शासकीय नर्सिंग महाविद्यालयात प्रवेश मिळाला आहे; परंतु महाविद्यालय व होस्टेल प्रवेशासाठी १९ हजार रुपये भरायचे आहेत. त्यापैकी १२ हजार रुपयांची जुळवाजुळव मी केली आहे, अजून ७ हजार रुपयांची गरज आहे. यावर सभापती मंदाताई करांडे व आरोग्य विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासह तुटपुंज्या मानधनात काम करणाºया आशा सेविका व गटप्रवर्तक या सर्वांनी त्यांना तातडीने जुळवाजुळव करून ७ हजार रुपये दिले.
घरची परिस्थिती हलाकीची असल्याने सुनीता व त्यांचे पती दोघेही मोलमजुरीवरच कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवितात. अठराविश्व दारिद्र्य अशा स्थितीत मुलगा व मुलीच्या शिक्षणाचा खर्च वाढत आहे. अशात सुनीता वायदंडे यांना त्यांच्या सहकारी ‘आशां’नी आधार दिला आणि प्राजक्ताच्या महाविद्यालयीन प्रवेशाचा प्रश्न सुटला.

प्राजक्ता आमचीच मुलगी
सुनीता वायदंडे या आमच्या सहकारी आहेत. अत्यंत गरीब परिस्थितीतून स्वत:च्या हिमतीवर त्या मुलांना शिक्षण देत आहेत. पण त्यांची मुलगी प्राजक्ता पैशाअभावी शिक्षणापासून वंचित राहू नये, म्हणून आम्ही तात्काळ ७ हजार रुपये जमा केले. सुनीता यांची मुलगी प्राजक्ता ही आमच्या मुलीसारखीच आहे, अशी भावना आशा वर्कर्सनी व्यक्त केली.

Web Title: 'Asha' created human philosophy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.