आशा, गटप्रवर्तक कर्मचारी १५ जूनपासून संपावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:20 AM2021-06-06T04:20:34+5:302021-06-06T04:20:34+5:30
सांगली : कोरोना महामारीत आशा, गटप्रवर्तक कर्मचारी जीव धोक्यात घालून काम करीत आहेत. या कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करूनही तो ...
सांगली : कोरोना महामारीत आशा, गटप्रवर्तक कर्मचारी जीव धोक्यात घालून काम करीत आहेत. या कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करूनही तो वर्षभरात दिला नाही. याच्या निषेधार्थ आणि रोज ५०० रुपये स्वतंत्र मोबदला द्यावा, या मागणीसाठी दि. १५ जूनपासून आशा, गटप्रवर्तक संपावर जाणार आहेत, अशी माहिती कृती समितीचे कॉ.शंकर पुजारी यांनी दिली.
कॉ.पुजारी म्हणाले, आशा, गटप्रवर्तकांच्या मागण्याबाबत चर्चा करण्यासाठी मुंबईतील आरोग्य भवन येथे अधिकारी आणि संघटनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये चर्चा झाली. महाराष्ट्र शासनाने आशा महिलांना जी दरमहा दोन हजार रुपये वाढ केली आहे, ती पूर्णपणे दिली जात नाही. त्याच्यामध्ये काटछाट केली जात आहे. सध्या कोरोना महामारीमध्ये आशा महिलांवर सक्तीने जादा काम करून घेतली जात आहेत. म्हणूनच आशा व गटप्रवर्तक महिलांना सध्या मिळणाऱ्या मोबदल्याशिवाय दररोज कोरोनाचा प्रोत्साहन भत्ता ५०० रुपये मिळाला पाहिजेत. याबाबत अभियान संचालक रामस्वामी यांनी आरोग्यमंत्री, सार्वजनिक आरोग्य खात्याचे सचिव व्यास यांच्याशी चर्चा करून १० जूनपर्यंत बैठक घेऊन तोडगा काढण्याचे आश्वासन दिले आहे. १० जूनपर्यंत मागण्याबाबत शासनाने निर्णय घेतला नाही, तर १५ जूनपासून बेमुदत कामबंद आंदोलन करण्यात येणार आहे. आंदोलनामुळे जो प्रश्न निर्माण होईल, त्यास सरकार जबाबदार असेल.