आशा झिमुर यांचा ‘वूमन ॲचिव्हर्स ॲवार्ड’ने सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:22 AM2021-07-17T04:22:19+5:302021-07-17T04:22:19+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शिराळा : शिरशी (ता. शिराळ) येथील जिल्हा परिषद सदस्य व समाजसेविका आशाताई विजय झिमुर यांना ‘लोकमत ...
लोकमत न्यूज नेटवर्क
शिराळा : शिरशी (ता. शिराळ) येथील जिल्हा परिषद सदस्य व समाजसेविका आशाताई विजय झिमुर यांना ‘लोकमत वूमन ॲचिव्हर्स ॲवार्ड’ने सन्मानित करण्यात आले. विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याहस्ते व पर्यावरण मंत्री अदिती तटकरे, ठाणे महानगरपालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा, विशाखा सुभेदार, अदिती सारंगभर, मनीषा केळकर, डॉ. निवेदिता श्रेयन्स यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्काराचे वितरण करण्यात आले.
आशाताई झिमुर या २०१७ मध्ये जिल्हा परिषद निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडीतून विजयी झाल्या होत्या. गेली १२ वर्षांपासून आशाताई झिमुर आणि त्यांचे पती विजय झिमुर हे धार्मिक व समाजकारणात असून, ते दोघेही सामान्य जनमाणसांच्या तसेच लोक कल्याणासाठी काम करत आहेत. राजकारणांसोबत त्यांनी २०१८ मध्ये स्वतःची मनस्वी फाउंडेशन ही संस्था स्थापन केली. या संस्थेंतर्गत महिलांसाठी अनेक उपक्रम व विद्यार्थ्यांसाठी आर्थिक, शैक्षणिक मदत त्या करत आहेत.
शिरसी येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेचे नूतनीकरणाचे कार्य त्यांनी हाती घेतले आहे. बेघर नागरिक, महिलांना शासनाच्या घरकुल योजनेतून अनेक घरे बांधून दिली आहेत. त्यांनी मनस्वी मागासवर्गीय महिला सेवा सहकारी संस्था स्थापन करून मुंबईमधील एक हजारपेक्षा गरजू महिलांना मदत केली आहे. या कार्यात त्याना रोहित झिमुर, सूर्यकांत गायकवाड, दिनेश झिमुर, शंकर झिमुर, वैशाली ओव्हाळ, सुकेशिनी साळवे, सारिका झिमुर, वीना पवार यांचे सहकार्य मिळत आहे.`