आष्टा शहर स्मार्ट सिटी बनविणार
By admin | Published: December 15, 2014 10:47 PM2014-12-15T22:47:26+5:302014-12-16T00:12:16+5:30
जयंत पाटील : नगरपालिकेचा हीरकमहोत्सवी कार्यक्रम उत्साहात
आष्टा : ब्रिटिशांनी आष्टा शहराचे भौगोलिक महत्त्व ओळखून मुंबईबरोबर आष्टा पालिकेची १८५३ मध्ये स्थापना केली. आष्टा शहराला थोर परंपरेचा वारसा लाभला आहे. मोठ्या शहरात असणाऱ्या समस्या याठिकाणी नाहीत. आष्टा शहर हे सर्वसोयींनीयुक्त शहर असून, ते स्मार्ट सिटी करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन माजी ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांनी केले.
आष्टा नगरपालिकेच्या शतकोत्तर हीरकमहोत्सवानिमित्त आजी, माजी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवक, मुख्याधिकारी यांचा नगरपालिकेच्यावतीने सत्कार करण्यात आला. यावेळी जयंत पाटील बोलत होते. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदे, राजारामबापू वस्त्रोद्योग संकुलाचे अध्यक्ष दिलीप पाटील, आनंदराव पाटील, नगराध्यक्षा मंगलादेवी शिंदे, उपनगराध्यक्ष के. सी. वग्याणी, उद्योगपती नितीन झंवर, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष दिलीप वग्याणी, विराज शिंदे, प्रकाश रुकडे, मुख्याधिकारी पंकज पाटील, अभियंता चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
जयंत पाटील म्हणाले, आष्टा शहराला विलासराव शिंदे यांच्या रूपाने चांगले नेतृत्व लाभले आहे. पाणी पुरवठा, घरकुल, रस्ते, गटारी यासह लोकोपयोगी विविध योजना राबवून शहराचा सर्वांगीण विकास साधला आहे. आष्टा पालिका राज्यात आदर्श आहे. याहीपुढे जाऊन शहर स्मार्ट सिटी बनवण्यासाठी शिंदे आणि मी प्रयत्न करणार असून, त्यादृष्टीने प्रयत्न सुरु असल्याचेही त्यांनी सांगितले.
विलासराव शिंदे म्हणाले की, आष्टा शहर शौचालययुक्त करण्यात येणार आहे. सात तीर्थक्षेत्रांची कामे पूर्ण, रमाईसह सर्व घरकुले पूर्ण करण्यात येणार त्यांनी स्पष्ट केले.
मंगलादेवी शिंदे म्हणाल्या, पूर्ण झालेल्या घरकुलात पाण्याची सोय करून लवकरच ती लाभार्थ्यांना देण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
यावेळी माजी नगराध्यक्षा झिनत आत्तार, झुंझारराव पाटील, रंजना शेळके, जानकास ढोले, प्रणव चौगुले, विजयमाला वग्याणी, सुरेंद्र वग्याणी, भालचंद्र बोंडे, बाबा सिध्द, शेरनवाब देवळे, सतीश माळी, मारुती रेवले-पाटील यांचा सत्कार करण्यात आला. तसेच १२ अंगणवाड्यांना पाण्याचा पिंप व सतरंजीचे वाटप करण्यात आले.
मुख्याधिकारी पंकज पाटील यांनी आभार मानले. यावेळी आयेशा इनामदार, रघुनाथ जाधव, बी. के. पाटील आदी उपस्थित होते. (वार्ताहर)
गुणवत्ता महत्त्वाची
वस्त्रोद्योग संकुलाचे अध्यक्ष दिलीप पाटील यांनी आपल्या भाषणात जयंत पाटील यांनी आगामी काळात टॅलेंटला महत्त्व देऊन गतीला साथ देणारी माणसे निवडावीत, असा सल्ला दिला.