आष्टा, इस्लामपुरात आघाडी, अन्यत्र स्वबळावर लढणार

By admin | Published: October 23, 2016 12:10 AM2016-10-23T00:10:28+5:302016-10-23T00:41:45+5:30

पतंगराव कदम : स्थानिक कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय

Ashta, the leader in Islampur and others will fight on their own | आष्टा, इस्लामपुरात आघाडी, अन्यत्र स्वबळावर लढणार

आष्टा, इस्लामपुरात आघाडी, अन्यत्र स्वबळावर लढणार

Next

सांगली : आष्टा आणि इस्लामपूर येथे स्थानिक पातळीवर अन्य पक्षांशी आघाडी करण्यात येणार असून, अन्यत्र कॉँग्रेस स्वबळावर निवडणूक लढवणार आहे, अशी माहिती माजी मंत्री, आमदार डॉ. पतंगराव कदम यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना दिली. ते म्हणाले की, जिल्ह्यातील पाच नगरपालिका आणि चार नगरपंचायतीच्या निवडणुकीत परिस्थितीनुसार स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याबाबत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी सूचविले होते. नगरपालिका व नगरपंचायतींच्या क्षेत्रात झालेल्या प्राथमिक चाचपणीनंतर आष्टा आणि इस्लामपूर वगळता अन्यत्र स्वबळावर लढण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. आष्टा आणि इस्लामपूर नगरपालिकेसाठी कोणाशी आघाडी करायची, याबाबत अद्याप निर्णय कोणताही झालेला नाही. परिस्थितीनुसार कॉँग्रेस पक्षाच्या हिताचा जो निर्णय असेल, तो घेतला जाईल.
सांगली-सातारा स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद निवडणुकीबाबत ते म्हणाले की, येत्या २७ आॅक्टोबररोजी सकाळी अकरा वाजता आम्ही काँग्रेसतर्फे मोहनराव कदम यांच्या उमेदवारीचा अर्ज दाखल करणार आहोत. ४० वर्षापासून मोहनराव कदम हे कोणत्याही पदाची अपेक्षा न ठेवता पक्षासाठी काम करीत आले आहेत. जिल्ह्यातील सहकार चळवळीच्या वाटचालीत त्यांचे योगदान मोठे आहे. मोहनराव कदम यांना मानणारा सांगली व सातारा जिल्ह्यात मोठा गट आहे. विविध सहकारी संस्था त्यांच्या मार्गदर्शनाखाली सक्षमपणे सुरू आहेत. त्यामुळे सांगली आणि सातारा जिल्ह्यातून मोहनराव कदम यांच्या नावाचा उठाव झालेला आहे.
गतवेळी ही जागा राष्ट्रवादी कॉंग्रेसला दिली होती. आता ती काँग्रेसला द्यायला हवी. दोन्ही पक्षांची आघाडी असल्याने एकवेळ काँग्रेसलाही संधी मिळायला हवी, अशी मागणी होत आहे. त्यामुळे उमेदवारी अर्ज भरण्यात येत आहे. यासंदर्भात राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्याशी अद्याप चर्चा झालेली नाही. लवकरच चर्चा होऊन सकारात्मक निर्णय होईल. (प्रतिनिधी)


आता माघार नाही...
यावेळी मोहनराव कदम म्हणाले की, पूर्ण विचारांती, कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर राखत सांगली-सातारा विधानपरिषदेसाठी अर्ज दाखल करणार आहे. आता कोणत्याही परिस्थितीत माघार घेतली जाणार नाही. राष्ट्रवादीने जर काँग्रेसला ही जागा दिली नाही, तर पक्षीय स्तरावर योग्य निर्णय होईल. काँग्रेस स्वबळावर लढली तरी या जागेवर मी निवडून येऊ शकतो. सर्वच पक्षात माझे मित्र आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीच्या सदस्यांकडूनही मला मदत मिळू शकते.

Web Title: Ashta, the leader in Islampur and others will fight on their own

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.