आष्टा एमआयडीसीला उद्योग मंत्रालयाकडून मंजुरी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2023 12:15 PM2023-04-19T12:15:36+5:302023-04-19T12:15:59+5:30
उद्योग विभागाच्या अधिकाऱ्यांसह सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांना जागेची पाहणी करण्याचे आदेश
आष्टा : हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील शाहूवाडी व आष्टा येथे एमआयडीसी उभारण्यास शासनाच्या उद्योग विभागाने तत्वत: मान्यता दिली आहे. संबंधित विभागाने तत्काळ प्रस्ताव सादर करावेत, असे निर्देश उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिले आहेत.
मुंबई येथे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या निवासस्थानी कोल्हापूरचे पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत आयोजित बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
आष्टा येथे एमआयडीसी व्हावी अशी अनेक वर्षांपासूनची मागणी होती. यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरु हाेता. यासाठी आयाेजित बैठकीत आष्टा येथील एमआयडीसीला तत्वत: मान्यता देण्यात आली. उद्योग विभागाच्या अधिकाऱ्यांसह सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांना जागेची पाहणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार गुरूवार दि. २० एप्रिल रोजी आष्टा येथील जागेची पाहणी करण्यात येणार आहे.
या बैठकीस इचलकरंजीचे आमदार प्रकाश आवाडे, एमआयडीसीचे बिपिन शर्मा, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, डॉ. राजा दयानिधी, सहसचिव संजय देगावकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी पाटील, प्रादेशिक अधिकारी राहुल भिंगारे, सांगलीच्या प्रादेशिक अधिकारी वसुंधरा बिरजे, विजयसिंह देसाई, भाऊसाहेब आवळे, आनंदराव पवार, सागर मलगुंडे, नगरसेवक वीर कुदळे प्रमुख उपस्थित होते.