आष्टा पालिका निवडणूक राष्ट्रवादीच्या चिन्हावर?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 04:26 AM2020-12-22T04:26:32+5:302020-12-22T04:26:32+5:30
सुरेंद्र शिराळकर लोकमत न्यूज नेटवर्क आष्टा : आष्टा पालिकेची निवडणूक वर्षभरावर आली आहे. माजी आमदार विलासराव शिंदे यांच्या आष्टा ...
सुरेंद्र शिराळकर
लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टा : आष्टा पालिकेची निवडणूक वर्षभरावर आली आहे. माजी आमदार विलासराव शिंदे यांच्या आष्टा शहर विकास आघाडीसोबत जलसंपदा मंत्री जयंत पाटील गट सत्तेत आहे. मात्र, काल झालेल्या कार्यक्रमात कारखान्याचे संचालक विराज शिंदे, माणिक शेळके यांनी आष्टा पालिका निवडणूक राष्ट्रवादी पक्षाच्या चिन्हावर लढवण्यात यावी, अशी मागणी केली. त्याला सर्वांनी टाळ्या वाजवून दाद दिली. त्यामुळे येणारी पालिका निवडणुकीत जयंत पाटील गट राष्ट्रवादीच्या चिन्हावर लढवणार का? याची शहरात जोरदार चर्चा सुरू आहे.
१९९६ मध्ये माजी आमदार विलासराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आष्टा शहर विकास आघाडी अस्तित्वात आली. या आघाडीचे अध्यक्षपद विलासराव शिंदे यांचे बंधू माजी नगराध्यक्ष झुंजारराव शिंदे यांना देण्यात आले. १९९६ पासून सुमारे २४ ते २५ वर्षे पालिकेवर आष्टा शहर विकास आघाडीची सत्ता आहे. मंत्री जयंत पाटील व शिंदे गटाची पालिकेत सत्ता आहे. १९९९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेनंतर माजी आमदार विलासराव शिंदे यांना सांगली जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्षपद देण्यात आले. ते अखेरच्या क्षणापर्यंत जिल्हा राष्ट्रवादीचे अध्यक्ष होते. मात्र त्यांनी स्थापन केलेल्या आष्टा शहर विकास आघाडीच्यावतीने १९९६ पासून २०१६ अखेर पालिका निवडणुका लढविण्यात आल्या. विलासराव शिंदे व जयंत पाटील यांच्या बेरजेच्या राजकारणामुळे आष्टा पालिकेत राष्ट्रवादीची सत्ता आली, मात्र निवडणूक शहर विकास आघाडीच्यावतीनेच लढविण्यात आली. आष्टा शहर युवक राष्ट्रवादीच्या कार्यालयाचे उद्घाटन मंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी संचालक विराज शिंदे, माणिक शेळके यांनी पालिका निवडणूक राष्ट्रवादीच्या चिन्हावर लढविण्याची मागणी केली. त्याला सर्वांनी टाळ्या वाजवून अनुमोदन दिले. यावेळी आष्टा शहर विकास आघाडीचे अध्यक्ष झुंजारराव शिंदे, माजी नगराध्यक्ष झुंजारराव पाटील, आष्टा शहर राष्ट्रवादीचे अध्यक्ष प्रकाश रूकडे, नगराध्यक्ष स्नेहा माळी यांच्यासह दोन्ही गटातील कार्यकर्ते उपस्थित होते.
चौकट:
माजी आमदार विलासराव शिंदे यांच्या पश्चात जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आष्टानगरीचे पालकत्व स्वीकारले आहे त्यामुळे त्यांचा ‘शब्द’ पालिकेत अंतिम असणार आहे मंत्री पाटील राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावर निवडणूक लढविणार की आष्टा शहर विकास आघाडीच्या चिन्हावर हे लवकरच समजणार आहे
(फोटो जयंत पाटील, विलासराव शिंदे)