आष्टा पालिकेत सत्ताधारी-विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 04:27 AM2021-03-26T04:27:22+5:302021-03-26T04:27:22+5:30

आष्टा : आष्टा शहरातील आष्टा - तासगाव मार्गावरील फिल्टर हाऊससमोरील नगरपालिकेच्या नावावरील सहा एकर सहा गुंठे जागा पुन्हा शासनाच्या ...

In Ashta Palika, there is a strong rift between the ruling party and the opposition | आष्टा पालिकेत सत्ताधारी-विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी

आष्टा पालिकेत सत्ताधारी-विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी

Next

आष्टा : आष्टा शहरातील आष्टा - तासगाव मार्गावरील फिल्टर हाऊससमोरील नगरपालिकेच्या नावावरील सहा एकर सहा गुंठे जागा पुन्हा शासनाच्या नावावर झाल्याने गुरुवारी पालिकेच्या सभेत विरोधकांनी सत्ताधारी गटाला धारेवर धरले. यावरुन विरोधी पक्षनेते वीर कुदळे व माजी नगराध्यक्ष झुंजारराव पाटील, धैर्यशील शिंदे, अर्जुन माने यांच्यात जोरदार खडाजंगी झाली.

या सर्वसाधारण सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा स्नेहा माळी होत्या. मुख्याधिकारी डॉ. कैलास चव्हाण, उपनगराध्यक्षा प्रतिभा पेटारे यावेळी उपस्थित होत्या. आष्टा - तासगाव रस्त्यावरील जागा एकात्मिक गृहनिर्माण व झोपडपट्टी विकास कार्यक्रम योजनेंतर्गत घरकुल बांधण्यासाठी विनामूल्य, काही अटी व शर्तींवर देण्यात आली होती. मात्र, या जमिनीचा पालिकेने दिलेल्या कारणासाठी वापर न केल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी २ मार्च रोजी मुख्याधिकाऱ्यांचे नाव कमी करून महाराष्ट्र शासनाचे नाव दाखल केले आहे.

याबाबत मुख्याधिकाऱ्यांनी नगराध्यक्षा माळी व गटनेते विशाल शिंदे यांना कल्पना दिल्याचे व पालिकेच्या बैठकीत चर्चा करून कळविणार असल्याचे सांगितले. मात्र, तोपर्यंत या जागेवरील नाव हटवले गेल्याने जोरदार खडाजंगी झाली. शहरातील विलासराव शिंदे शॉपिंग सेंटरसह गाळेधारकांना मुदतवाढ देण्याबाबतही जोरदार चर्चा झाली. अखेरीस शासनाच्या नियमानुसार कौन्सिलने निर्णय घेण्याचे ठरले. शिवाजी चौक येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यासाठी ना हरकत दाखला देण्यात आला. राजारामबापू इंडोमेंट ट्रस्टच्यावतीने हुतात्मा स्मारकात वाचनालय सुरू करण्यास मान्यता देण्यात आली. पाणीपुरवठा योजनेसह सर्वोदय कारखान्याजवळील घनकचरा प्रकल्प ठेका पद्धतीने चालविण्यास देण्यास मंजुरी देण्यात आली.

यावेळी विकास बोरकर, पी. एल. घस्ते, विशाल शिंदे, सारिका मदने, मनीषा जाधव, पुष्पलता माळी, संगीता सूर्यवंशी, मंगल सिद्ध, वर्षा अवघडे, विमल थोटे उपस्थित होते.

चौकट

बेघरांच्या घरांचा प्रश्न ऐरणीवर

सत्ताधारी गटाने व मुख्याधिकाऱ्यांनी संगनमत करून घरकुलासाठी राखीव असलेली ६.६ एकर जमीन गॅस एजन्सीचा ठेकेदार पोसण्यासाठी हस्तांतरित केल्याचा कागदोपत्री पुरावा सादर केला असून, कोट्यवधींची आर्थिक तडजोड झाल्याचा आरोप वीर कुदळे यांनी केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे कुदळे यांनी सांगितले.

Web Title: In Ashta Palika, there is a strong rift between the ruling party and the opposition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.