आष्टा ते टाेप रस्त्याचे काम निकृष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 04:25 AM2021-02-13T04:25:51+5:302021-02-13T04:25:51+5:30
बागणी : दिघंची, आटपाडी आष्टा ते टोप रस्ता नं. १५१ असलेल्या रस्त्याचे डांबरीकरणाचे काम टेंडरनुसार केले जात नसून रस्त्याचे ...
बागणी : दिघंची, आटपाडी आष्टा ते टोप रस्ता नं. १५१ असलेल्या रस्त्याचे डांबरीकरणाचे काम टेंडरनुसार केले जात नसून रस्त्याचे काम निकृष्ट होत असल्याचा आरोप शिवसेना वाळवा तालुकाप्रमुख युवराज निकम यांनी केला आहे.
निकम म्हणाले, ठेकेदार व सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांच्या संगनमतामुळे रस्त्याच्या कामात ठेकेदारांकडून हलगर्जीपणा सुरू आहे. दिघंची, आटपाडी, आष्टा ते टोप असा ८८ किलोमीटरचा हा रस्ता आहे. प्रशासकीय मंजुरीनुसार ४५० कोटींचे काम असून, या मुख्य रस्त्याचे काम हे महा अरविंद रोडवेज प्रा. लि. या ठेकेदार कंपनीला देण्यात आले आहे. दिघंची ते टोप असा कोल्हापूरला जोडणारा मुख्य रस्ता असल्याने ह्या रस्त्याचे काम सुरू झाल्यानंतर नागरिकांसह व वाहनचालकांनाही दिलासा मिळाला. गेल्या अनेक वर्षांची रस्त्याची कटकट कायमची मिटणार, असे वाटू लागले होते. मात्र, रस्त्याचे काम टेंडरनुसार सुरू नसल्याच्या तक्रारी आल्यानंतर शिवसेना वाळवा तालुकाप्रमुख युवराज निकम यांचे गेले २१ दिवस सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाच्या समोर इस्लामपूर येथे आंदोलन सुरू केले या आंदोलनाची दखल घेत जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चाैधरी यांनी तपासणी करण्याचे आदेश दिले.
त्यानुसार शुक्रवारी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी तसेच ठेकेदार यांनी युवराज निकम व नागरिक यांच्या समोर रस्त्याची ब्लॉक करून तपासणी करण्यात आली.यावेळी रस्त्याचे तपासणीचे नमुने काढून प्रयोग शाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले. यावेळी उपस्थित लोकांनी जी.एस.बी. थराला खडी नसल्याचे निदर्शनास आणले परंतु समोरील परिस्थितीकडे कानाडोळा करत अधिकाऱ्यांनी लॅब रिपोर्ट आल्यावर पाहू, असी उडवाउडवीची उत्तरे दिली.
यावेळी उपअभियंता सुभाष पाटील, युनिसन कंपनीचे अधिकारी महेंद्र कुंभार, शिवसेना जिल्हाप्रमुख आनंदराव पवार, शेतकरी संघटनेचे बी. जी. पाटील, तालुका प्रमुख युवराज निकम, युवा सेना जिल्हाप्रमुख विनायक गोंदिल, आष्टा सेनाप्रमुख राकेश आटुगडे, शिक्षक सेना जिल्हाप्रमुख भूषण भासर, विभागप्रमुख संजय चव्हाण, बागणी प्रमुख आनंदराव सावंत, शशिकांत नगारे, तानाजी घोरपडे, घनशाम जाधवसह मोठ्या संख्येने नागरिक व शेतकरी उपस्थित होते.