आष्टेकरांनी दिला पूरग्रस्तांना आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:24 AM2021-08-01T04:24:29+5:302021-08-01T04:24:29+5:30
सुरेंद्र शिराळकर लोकमत न्यूज नेटवर्क आष्टा : आष्टा शहरातील विविध सामाजिक संस्थांसह नागरिकांनी महापुराच्या संकटात पूरग्रस्तांना मदतीचा हात दिला. ...
सुरेंद्र शिराळकर
लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टा : आष्टा शहरातील विविध सामाजिक संस्थांसह नागरिकांनी महापुराच्या संकटात पूरग्रस्तांना मदतीचा हात दिला.
आष्टा शहरात २००५, २०१९ या महापुरावेळी हजारो पूरग्रस्तांना निवारा मिळाला. पूरग्रस्तांना फक्त निवाराच दिला नाही तर त्यांना चहा, अल्पोपहार, सकाळ-सायंकाळ जेवण यासह कपडे, औषधे, अंथरूण-पांघरूण व वैद्यकीय सेवाही दिली.
सांगली व इस्लामपूरपासून सुमारे २० किलोमीटर अंतरावर असणारे आष्टा कृष्णा व वारणा नदीपासून जवळच आहे. मात्र, परिसरातील अनेक गावांत महापूर आला तरी आष्टा उंच ठिकाणी असल्याने येथे आजअखेर कधीही पुराचे पाणी आलेले नाही.
यंदा कृष्णाकाठच्या अंकलखोप, वाळवा, नागठाणे, कृष्णानगर हाळ, दुधगाव, सावळवाडी, माळवाडी, कसबे डिग्रज, सांगलीवाडी या परिसरातील नागरिकांना आष्ट्याने आधार दिला. परिसरातील हजारो पूरग्रस्त वास्तव्यासाठी आष्ट्यात होते. या पूरग्रस्तांच्या निवाऱ्याची व जेवणाची व्यवस्था विलासराव शिंदे विद्यालय, कन्या शाळा, डांगे महाविद्यालय, मुस्लिम समाज घरकुल योजना यासह जिल्हा परिषद शाळा क्रमांक ९ व १७ येथे केली हाेती. या पूरग्रस्तांना तहसीलदार दीक्षांत देशपांडे, मुख्याधिकारी डॉ. कैलास चव्हाण यांच्यासह वैभव शिंदे युवा मंच, बापूसाहेब शिंदे सेवाभावी संस्थेसह विविध सेवाभावी संस्था संघटना, पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी मदत दिली. युवक नेते प्रतीक पाटील, वैभव शिंदे यांच्यासह मान्यवरांनी पूरग्रस्तांची भेट घेऊन त्यांना आधार दिला.