अश्विनी बिद्रे बेपत्ताप्रकरणी कुपवाडच्या व्यापाऱ्याचा शोध, सांगली कनेक्शन उघड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2017 12:59 PM2017-12-11T12:59:23+5:302017-12-11T13:03:22+5:30
सहाय्यक पोलिस निरीक्षक अश्विनी ब्रिद्रे बेपत्ता कनेक्शन सांगलीपर्यंत असल्याचे नवी मुंबई पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. दीड वर्षापूर्वी बिद्रे बेपत्ता झाल्या, त्यावेळी कुपवाडचा एक व्यापारी पोलिस निरीक्षक अभय कुरुंदकर याच्या संपर्कात होता, अशी माहिती तपासातून पुढे आली आहे.
सांगली : सहाय्यक पोलिस निरीक्षक अश्विनी ब्रिद्रे बेपत्ता कनेक्शन सांगलीपर्यंत असल्याचे नवी मुंबई पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. दीड वर्षापूर्वी बिद्रे बेपत्ता झाल्या, त्यावेळी कुपवाडचा एक व्यापारी पोलिस निरीक्षक अभय कुरुंदकर याच्या संपर्कात होता, अशी माहिती तपासातून पुढे आली आहे.
नवी मुंबई पोलिसांनी या व्यापाऱ्याला ताब्यात घेण्यासाठी सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाशी रविवारी संपर्क साधला आहे.
कुरुंदकर व अश्विनी बिद्रे यांनी सांगलीत स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागात एकत्रित नोकरी केली आहे. दोघेही कोल्हापूर जिल्ह्यातील असल्याने त्यांची चांगली ओळख झाली. यातून त्यांच्यातील जवळीकता वाढत गेली.
दोघांनी दोन-तीन महिन्यांच्या अंतराने सांगलीतून जिल्ह्याबाहेर बदली झाली. कुरुंदकरने पालघर जिल्ह्यातील नवघर पोलिस ठाण्यात सेवा बजावल्यानंतर त्याची ठाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागात बदली झाली.
अश्विनी बिद्रे यांची सांगलीतून रत्नागिरीत बदली झाली. दीड वर्षे सेवा झाल्यानंतर त्यांची नवी मुंबईतील कळंबोली पोलिस ठाण्यात बदली झाली होती. पण त्या तिथे हजर झाल्याच नाहीत. गेली दीड वर्षे त्या बेपत्ता होत्या. त्यांच्या पतीने तशी फिर्याद दिली होती.
दोन दिवसापूर्वी या प्रकरणाला वेगळीच कलाटणी मिळाली. अश्विनी यांच्या पतीने घातपात झाल्याचा संशय व्यक्त केला. कुरुंदकरला तातडीने अटक केली. सध्या तो पोलिस कोठडीत आहे. ज्यावेळी अश्विनी बेपत्ता झाल्या, त्या काळात कुरुंदकरच्या संपर्कात आलेल्या सर्वांची नवी मुंबई पोलिसांकडून चौकशी सुरू आहे.
कुरुंदकरांचे कॉल डिटेल्स काढण्यात आले आहेत. यामध्ये कुपवाडमधील एक व्यापारीही कुरुंदकरांच्या संपर्कात आल्याची माहिती
मिळाली. या व्यापाऱ्याला ताब्यात घेण्यासाठी नवी मुंबई पोलिसांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाशी संपर्क साधला आहे. हा व्यापारी कोण? याबद्दल रविवारी सांगली, कुपवाडमध्ये जोरदार चर्चा सुरू होती. तो नेहमी कुरूंदकर यांना भेटण्यासाठी कुपवाड पोलिस ठाण्यात जात असे.
मुंबई पोलिस येणार!
अश्विनी बिद्रे बेपत्ता तपासाचे कनेक्शन सांगलीपर्यंत आल्याने नवीन मुंबई पोलिसांचे पथक तपासासाठी कदाचित सांगलीत येण्याची शक्यता आहे. हा व्यापारी कुरुंदकरांच्या संपर्कात का आला होता, याचा उलगडा करण्यासाठी जोरदार तपास सुरू आहे. या व्यापाºयाच्या नावाबाबत पोलिसांनी कमालीची गोपनीयता बाळगली असल्याचे त्याचे नाव समजू शकले नाही.