सांगलीत एजंट का आलेत विचारत ‘आरटीओं’ना धक्काबुक्की, अंकुश केरीपाळेंवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2023 11:59 AM2023-12-09T11:59:14+5:302023-12-09T11:59:57+5:30
सांगली : येथील आरटीओ कार्यालयात उपप्रादेशिक परिवहन अधिकारी प्रशांत साळी (५१) यांना एजंट का आले? याचा जाब विचारून मोबाइलवर ...
सांगली : येथील आरटीओ कार्यालयात उपप्रादेशिक परिवहन अधिकारी प्रशांत साळी (५१) यांना एजंट का आले? याचा जाब विचारून मोबाइलवर व्हिडीओ चित्रीकरण करून शिवीगाळ करून धक्काबुक्की केल्याबद्दल अंकुश केरीपाळे (रा. माधवनगर) यांच्यावर संजयनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अंकुश केरीपाळे यांचे आरटीओ कार्यालयाशी संबंधित कामाचे दुकान आहे. दोन दिवसांपूर्वी दुपारी केरीपाळे हे साळी यांच्या केबिनमध्ये गेले. तेथे मोबाइलचा कॅमेरा चालू करत शूटिंग सुरू केले. साळी यांना एकेरी भाषा वापरून ‘येथे एजंट का आले आहेत’ याचा जाब विचारला. साळी यांना धक्काबुक्की करत हाताला धरून ओढले. त्यांच्या हातातील सरकारी कागदपत्रे काढून भिरकावली. शिवीगाळ सुरू केली.
यावेळी आरटीओ कार्यालयातील लिपिक अमर मयेकर, संतोष मदने, श्रीनिवास घोडके, निरीक्षक गालिंदे, कामासाठी आलेले रोहन पोटे, सत्यजित हावरे यांनी मध्यस्थी करत वाद सोडवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा केरीपाळे ऐकण्याच्या स्थितीत नव्हते. त्यांनी साळी यांना हाताला धरून गेटच्या बाहेर ओढत आणले. तुला जिवंतच ठेवत नाही, अशी धमकी दिली. त्यामुळे केरीपाळे यांनी शासकीय कामात अडथळा आणून शिवीगाळ, दमदाटी केल्याबद्दल संजयनगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वादाचा ‘व्हिडीओ व्हायरल’
आरटीओ साळी यांच्या कार्यालयात घुसून त्यांना एजंट का आले आहेत, अशी विचारणा करणारा व्हिडीओ दोन दिवसांपासून चांगलाच व्हायरल झाला आहे. या ‘व्हायरल व्हिडीओ’ची चर्चा चांगलीच रंगली आहे. त्यावरून आरटीओ कार्यालयातील एजंटगिरीही चव्हाट्यावर आली आहे.