सिध्देवाडीत डांबरीकरण गायब, रस्त्यात खड्डे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 04:32 AM2021-09-09T04:32:19+5:302021-09-09T04:32:19+5:30
--------- लोकमत न्यूज नेटवर्क मालगाव : सिध्देवाडी (ता. मिरज) येथील गावाला जोडणाऱ्या दोन प्रमुख रस्त्यांची गौण खणिज ...
---------
लोकमत न्यूज नेटवर्क
मालगाव : सिध्देवाडी (ता. मिरज) येथील गावाला जोडणाऱ्या दोन प्रमुख रस्त्यांची गौण खणिज वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांमुळे चाळण झाली आहे. उखडून गेलेले डांबरीकरण, पडलेले खड्डे, साचलेले पाणी आणि चिखलाच्या घाणीच्या साम्राज्याने राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी ग्रामस्थांना अक्षरश: नरकयातना भोगाव्या लागत आहेत.
सिध्देवाडी गाव हे गौण खनिज उत्खननाचे केंद्र बनले आहे. यापूर्वी स्टोनक्रशरची खडी, क्रशस्टँडची अवजड वाहनातून वाहतूक सुरू होती. त्यामध्ये महामार्गाच्या कामामुळे भर पडली. ठेकेदार कंपनीकडून नियम धाब्यावर बसवून दिवस-रात्र दगड व मुरुमाची वाहतूक सुरू आहे. मिरज-पंढरपूर मार्गापासून कळंबी व खण फाटा हे सिध्देवाडी गावाला जोडणारे प्रमुख दोन रस्ते आहेत. या रस्त्यावरून ४० टनाहून अधिक क्षमतेच्या गौण खणिज वाहतुकीचा फटका प्रमुख दोन रस्त्यांसह गावाअंतर्गत रस्त्यांना बसला आहे. वाहतुकीने वर्षभरात डांबरीकरण गायब होऊन रस्त्यात खड्डे पडले आहेत. पावसाळ्यात पाण्याने रस्ते चिखलमय झाले आहेत. ग्रामस्थांनी अनेकवेळा अवजड वाहतूक रोखण्याचा प्रयत्न केला, मात्र राॅयल्टीच्या नावाखाली क्रशरचालक व महामार्ग ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दंडूकशाहीने वाहतूक सुरूच ठेवली अहे. प्रशासनही रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत अवजड वाहतुकीवर कारवाई करीत नसल्याने आम्ही दाद मागायची कोणाकडे, असा संतप्त सवाल ग्रामस्थांतून विचारला जात आहे. ग्रामस्थांनी रस्त्याच्या दुरुस्तीसाठी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
चौकट
...तर रस्ता रोको करणार - धडस
सिध्देवाडी गावाला जोडणाऱ्या कळंबी व खण फाटा या व गावांतर्गत रस्त्यांची अवजड वाहतुकीने मोठी दुरवस्था झाली आहे. दलदलीने गावात येता आणि फिरताही येत नाही. पंधरा दिवसांत दुरवस्था झालेल्या रस्त्यांचा प्रश्न मार्गी न लागल्यास मिरज-पंढरपूर मार्गावर रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा युवा नेते दादा धडस यांनी दिला आहे.
चौकट
गौण खनिज व स्थानिक विकास निधी द्या - कांबळे
आठ वर्षांपासून ग्रामपंचायतींना गौण खनिज व स्थानिक विकास निधी मिळालेला नाही. सिध्देवाडी गावच्या रस्ता कामासाठी जिल्हा प्रशासनाने रखडलेला गौण खनिज व स्थानिक विकास निधी मंजूर करावा, अशी मागणी पंचायत समिती सदस्य कृष्णदेव कांबळे यांनी केली आहे.