महापौर बदलाकडे इच्छुकांचे लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2019 12:01 PM2019-12-14T12:01:50+5:302019-12-14T12:03:58+5:30
महापौर संगीता खोत यांचा सव्वा वर्षाचा कार्यकाल पूर्ण झाल्याने त्यांच्या राजीनाम्याची प्रतीक्षा इच्छुकांना लागली आहे. सत्ताधारी भाजपच्या नेत्यांनी महापौर बदलावर शिक्कामोर्तब केले असले तरी, त्या राजीनामा कधी देणार, याबाबत मात्र संदिग्धता निर्माण झाली आहे. त्यामुळेच डिसेंबर महिन्यातील महासभेकडे इच्छुकांचे लक्ष लागले आहे.
सांगली : महापौर संगीता खोत यांचा सव्वा वर्षाचा कार्यकाल पूर्ण झाल्याने त्यांच्या राजीनाम्याची प्रतीक्षा इच्छुकांना लागली आहे. सत्ताधारी भाजपच्या नेत्यांनी महापौर बदलावर शिक्कामोर्तब केले असले तरी, त्या राजीनामा कधी देणार, याबाबत मात्र संदिग्धता निर्माण झाली आहे. त्यामुळेच डिसेंबर महिन्यातील महासभेकडे इच्छुकांचे लक्ष लागले आहे.
गेल्यावर्षी झालेल्या महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत सांगलीकरांनी भाजपला स्पष्ट बहुमत दिले. तब्बल ४० वर्षांच्या काँग्रेस, राष्ट्रवादीच्या सत्तेला सुरूंग लावत पहिल्यांदाच महापालिकेत भाजपची सत्ता आली. भाजपच्या पहिल्या महापौर होण्याचा मान संगीता खोत यांना मिळाला. खोत या पंधरा वर्षे नगरसेविका म्हणून काम करीत आहेत. त्यांनी विविध समितीत सदस्य, सभापती म्हणूनही काम केले होते. त्यामुळे त्यांचा अनुभव व ज्येष्ठता पाहून भाजपच्या नेत्यांनी महापौर पदाची सूत्रे त्यांच्या हाती दिल्याचे नेत्यांमध्ये चर्चा आहे.
सुरुवातीला दहा महिन्यांचा कालावधी निश्चित करण्यात आला होता. पण लोकसभा व विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर असल्याने महापौर बदल करण्यात आला नाही. विधानसभा निवडणुकीनंतर मात्र महापौर बदलासाठी इच्छुक नगरसेविकांनी आग्रह धरला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत सांगलीत नगरसेवकांची बैठकही झाली. पण त्यानंतर राज्यात सत्तास्थापनेचा घोळ निर्माण झाल्याने हा विषय मागे पडला.
आता पुन्हा एकदा इच्छुक नगरसेविकांनी उचल खाल्ली आहे. महापौर बदलावर शिक्कामोर्तब झाले असून, खोत यांचा राजीनामा कधी होणार, असा सवाल इच्छुकांकडून केला जात आहे. डिसेंबर महिन्यातच राजीनामा व्हावा, यासाठी इच्छुक आग्रही आहेत.
त्यामुळे भावी महापौरांनाही किमान वर्षाचा कालावधी मिळेल. त्यासाठी इच्छुक व त्यांच्या समर्थकांनी भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ, माजी मंत्री सुरेश खाडे, प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार यांच्याकडे तगादा लावला आहे. त्यात डिसेंबर महिन्याच्या महासभेत राजीनामा होईल, अशी चर्चा भाजपअंतर्गत सुरू आहे. पण महापौर खोत यांनी अद्याप महासभेची तारीखच निश्चित केलेली नाही. त्यामुळे इच्छुकांचे धाबे दणाणले असल्याचे दिसत आहे.