चढाई करणारा वर्षातील पहिला भारतीय : आसदच्या तरुणाचा माऊंट किलिमांजारोवर झेंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2020 12:25 AM2020-01-30T00:25:43+5:302020-01-30T00:27:20+5:30
चढाईसाठी प्रतिकूल वातावरण, उणे १५ ते २० अंश तापमान, अतिबर्फवृष्टी अशी परिस्थिती असतानाही प्रचंड आत्मविश्वास व जिद्दीच्या जोरावर श्रीकांतने भारतीय प्रजासत्ताक दिनादिवशी माऊंट किलिमांजारोवर तिरंगा फडकवला. हे शिखर सर्वांत लवकर सर करणारा श्रीकांत या वर्षातील पहिला गिर्यारोहक ठरला आहे.
अतुल जाधव ।
देवराष्ट्रे : आसद (ता. कडेगाव) येथील श्रीकांत संभाजी जाधव या २९ वर्षीय तरुण अभियंत्याने आफ्रिका खंडातील सर्वात उंच ५८९५ मीटर उंचीचे ‘माऊंट किलिमांजारो’ हे शिखर सर केले आहे.
चढाईसाठी प्रतिकूल वातावरण, उणे १५ ते २० अंश तापमान, अतिबर्फवृष्टी अशी परिस्थिती असतानाही प्रचंड आत्मविश्वास व जिद्दीच्या जोरावर श्रीकांतने भारतीय प्रजासत्ताक दिनादिवशी माऊंट किलिमांजारोवर तिरंगा फडकवला. हे शिखर सर्वांत लवकर सर करणारा श्रीकांत या वर्षातील पहिला गिर्यारोहक ठरला आहे.
श्रीकांत जाधव हा तरुण अभियंता सध्या पुण्यातील खासगी कंपनीत कार्यरत आहे. गेल्या सात वर्षांपासून तो गिर्यारोहण करतो. त्याने आतापर्यंत हिमालयातील माऊंट टेबल टॉप, माऊंट मैत्री, माऊंट मेंटोक कांगरी, एव्हरेस्ट बेस कॅम्प, काला पत्थर या मोहिमा फत्ते केल्या आहेत.
यावर्षी श्रीकांतला आफ्रिकेतील किलिमांजारो शिखर खुणावत होते. ते त्याने एकट्यानेच सर करायचे ठरवले. त्यासाठी एव्हरेस्टवीर अरुण तापकीर आणि कामगार नेते अरुण बोराटे आणि आफ्रिकेतील स्थानिक गाईड मुसा यांनी मार्गदर्शन केले. त्याने २२ जानेवारीला चढाईला सुरुवात केली. यासाठी ‘मचाने मे’ हा सर्वात अवघड मार्ग निवडला. या मार्गाने शिखर सर करण्यास सात दिवस लागतात, तरीही तो मार्ग त्याने निवडला. आजपर्यंत या मार्गाने केवळ भारताबाहेरचे गिर्यारोहक जात होते. मात्र कमी दिवसात या मार्गाने शिखर सर करुन २६ जानेवारीला श्रीकांतला शिखरावर तिरंगा फडकवायचा होता. त्यादृष्टीने त्याने प्रयत्न केले. पाचव्या दिवशी शिखर सर करुन २६ जानेवारीस सकाळी सव्वानऊ वाजता किलिमांजारो शिखरावर पोहोचल्यावर त्याने तिरंगा फडकवला. या शिखरावर या वर्षात सगळ्यात अगोदर पोहोचणारा गिर्यारोहक हा मान त्याला मिळाला आहे.
दिवंगत माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम यांचे नेहमीच पाठबळ लाभल्याने हे शिखर सर करून त्यांना श्रध्दांजली अर्पण केल्याचे श्रीकांतने सांगितले.
या मोहिमेसाठी उद्योजक प्रकाश छाब्रिया, रितु छाब्रिया, राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार, माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील, सहकार व कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम, डॉ. जितेश कदम, दिग्विजय कदम, शरद लाड यांचे प्रोत्साहन आणि मदत मिळाल्याचे त्याने सांगितले.
गावकऱ्यांना अभिमान
आसद गावातील श्रीकांत जाधव यांनी आफ्रिका खंडातील सर्वात उंचीचे शिखर सर केले. ही बाब गावासाठी अभिमानाची व युवकांसाठी प्रेरणादायी आहे, असे मत सरपंच मनीषा जाधव यांनी व्यक्त केले.