खुनातील आरोपीकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार; ‘पॅरोल’वर आल्यानंतर कृत्य; आरोपीला पोलिसांकडून अटक
By घनशाम नवाथे | Published: August 24, 2024 09:20 PM2024-08-24T21:20:45+5:302024-08-24T21:21:05+5:30
कठोर कारवाईसाठी जमावाची निदर्शने
घनशाम नवाथे
सांगली : खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेप भाेगताना ‘पॅरोल’वर आलेल्या आरोपी संजय प्रकाश माने (वय ३४, रा. चिंतामणीनगर झोपडपट्टी) याने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा प्रकार शुक्रवारी रात्री घडला. पोलिसांनी तत्काळ सूत्रे हलवून आरोपी माने याला अटक केली. दरम्यान, या नराधमावर कठोर कारवाई व्हावी, या मागणीसाठी लोकप्रतिनिधींसह शेकडो नागरिकांनी संजयनगर पोलिस ठाण्यासमोर निदर्शने केली. यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण होते.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, आरोपी संजय माने याच्याविरुद्ध २०११ मध्ये खून आणि खुनी हल्ल्याचा गुन्हा दाखल आहे. या खुनात त्याला एप्रिल २०२३ मध्ये जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. जन्मठेपेची शिक्षा भाेगणारा संजय हा काही दिवसांपूर्वी ‘पॅरोल’वर बाहेर आला आहे. मागील महिन्यात त्याने परिसरातील एका १५ वर्षीय मुलीस ‘तू मला आवडतेस,’ असे म्हणून हात पकडला होता. संजय हा आरोपी असल्यामुळे घाबरलेल्या पीडित मुलीने हा प्रकार कोणाला सांगितला नाही. त्यानंतर संजय हा तिच्या मागावर असायचा.
शुक्रवारी रात्री साडेनऊच्या सुमारास पीडित मुलगी ही दुकानात पापड आणायला गेली होती. परत येत असताना संजय याने ती घराजवळ आली असताना तिला बोलावले. ती जवळ येताच त्याने तिला घरात ओढून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर त्याने तिला ‘हा प्रकार कोणाला सांगितलास तर बघ,’ असे म्हणून धमकावले. पीडित मुलीला त्रास होऊ लागल्यानंतर शनिवारी सकाळी तिने आईला हा प्रकार सांगितला. त्यामुळे आई घाबरली. तिने तत्काळ पीडित मुलीला घेऊन जवळच असलेले संजयनगर पोलिस ठाणे गाठले.
पोलिस निरीक्षक बयाजीराव कुरळे यांना हा प्रकार सांगितला. त्यांनी तत्काळ पीडित मुलीची तक्रार नोंदवून घेतली. आरोपी संजय याच्याविरुद्ध ‘पोक्सो’अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. त्याला तत्काळ पकडण्याच्या सूचना दिल्या. दुपारी संजय याला पोलिसांनी अटक केली.
पोलिस स्टेशनसमोर निदर्शने...
दरम्यान, हा प्रकार समजताच पीडितेचे नातेवाईक आणि परिसरातील संतप्त नागरिक पोलिस ठाण्यासमोर जमले. शेकडोंचा जमाव जमला. यावेळी काँग्रेसच्या नेत्या जयश्री पाटील, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शिवाजी डोंगरे, माजी नगरसेवक मनोज सरगर यांच्यासह अनेकजण उपस्थित होते. त्यांनी संशयितावर कडक कारवाईची मागणी केली. संजयनगर परिसरात कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी तातडीने दंगल नियंत्रण पथकास पाचारण केले होते. काही काळ तणावाचे वातावरण होते. या घटनेनंतर आरोपीच्या घरासमोर आणि पीडितेच्या घराजवळ पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
या गुन्हासाठी जन्मठेपीची शिक्षा
चिंतामणीनगर परिसरातील १२ ते १४ वर्षांपूर्वी अजय माने आणि रवी शेवाळे या दोन गुंडांमध्ये वर्चस्वातून वाद होता. अजय माने याचा खून झाला होता. आरोपी संजय माने हा मानेच्या टोळीत होता. त्याने साथीदारांच्या मदतीने शेवाळेच्या टोळीतील सूरज ऊर्फ बाळू शब्बीर मगदूम याचा २२ मार्च २०११ रोजी खून केला. तसेच रोहन सकटेवर खुनी हल्ला केला. या गुन्ह्यात त्याला २०१३ मध्ये जन्मठेपेची शिक्षा झाली होती. दोन महिन्यांपूर्वी तो पॅरोलवर बाहेर आला होता.