सम्राटबाबांची शिराळ्यात विधानसभेची बांधणी : नोकरी मेळाव्यातून निवडणुकीचा बिगुल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2018 11:18 PM2018-03-23T23:18:29+5:302018-03-23T23:18:29+5:30
शिराळा : शिराळा विधानसभा मतदारसंघावर वाळवा तालुक्याचाही हक्क आहे, असा इशारा देत दरवेळी इतरांना पाठिंबा देणारे माजी जि. प. सदस्य व महाडिक युवा शक्तीचे संस्थापक सम्राट (बाबा) महाडिक यांनी ‘आता
विकास शहा ।
शिराळा : शिराळा विधानसभा मतदारसंघावर वाळवा तालुक्याचाही हक्क आहे, असा इशारा देत दरवेळी इतरांना पाठिंबा देणारे माजी जि. प. सदस्य व महाडिक युवा शक्तीचे संस्थापक सम्राट (बाबा) महाडिक यांनी ‘आता नाही तर परत नाही’ असे म्हणत विधानसभा निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. रविवारी होणाऱ्या नोकरी मेळाव्याच्या माध्यमातून ते बिगुल वाजविणार आहेत.
या मतदारसंघात भाजपचे आमदार शिवाजीराव नाईक, राष्ट्रवादीचे माजी आमदार मानसिंगराव नाईक, काँग्रेसचे सत्यजित देशमुख इच्छुक आहेत. राज्यस्तरावर काँग्रेस व राष्ट्रवादीच्या आघाडीचे संकेत मिळत आहेत. परंतु येथे यापूर्वीच मानसिंगराव नाईक व सत्यजित देशमुख यांनी हातात हात घालून समझोता एक्स्प्रेस सुसाट ठेवली आहे. त्यामुळे भाजप व काँग्रेस आघाडीतील लढत यावेळीही चुरशीने होणार आहे. त्यातच सम्राट महाडिक यांनीही विधानसभा लढविण्याची तयारी केली आहे. त्यामुळे तिरंगी लढत होण्याचे संकेत मिळत आहेत.
लोकसभा आणि विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवूनच सम्राट महाडिक यांनी शिराळा येथे नोकरी महोत्सवाचे आयोजन करुन युवकांचे संघटन मजबूत करण्याचा श्रीगणेशा केला आहे. मतदारसंघातही राजकीय जुळवाजुळवीला सुरुवात झाली आहे. रविवार दि. २५ रोजी होणाºया नोकरी मेळाव्याचे उद्घाटन राष्ट्रवादीचे खासदार धनंजय महाडिक व आ. नीतेश राणे यांच्याहस्ते ठेवल्याने हाचर्चेचा विषय बनला आहे. निमित्त नोकरी महोत्सवाचे असले तरी, महाडिक यांची शिराळा मतदार संघातून निवडणूक लढविण्याची तयारीच यातून दिसत आहे. प्रत्येकवेळी विविध आश्वासने देऊन पाठिंबा मिळवायचा, मात्र नंतर त्यांना दूर ठेवायचे, अशी खेळी करून महाडिक कुटुंबावर वारंवार अन्याय झाला आहे, अशी खंत महाडिक गटाच्या कार्यकर्त्यांतून व्यक्त होत आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून सम्राट महाडिक युवा शक्ती, विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून संवाद साधत आहेत. शिराळा मतदारसंघात येणाºया वाळवा तालुक्यातील ४८ गावांबरोबरच गावे, वाड्या-वस्त्यांवरील युवकांना काम मिळवून देण्यासाठी नोकरी मेळावा चर्चेचा ठरणार आहे. हा मेळावा म्हणजे सम्राट महाडिक यांचा विधानसभा निवडणुकीचा बिगुलच म्हणावा लागेल. त्यांच्या उमेदवारीने राजकीय समीकरणे बदलणार आहेत.
पाडापाडीचे राजकारण : कुटुंबाच्या जिव्हारीपेठ ग्रामपंचायत निवडणुकीत सम्राट महाडिक यांचा पाडाव करण्यासाठी विरोधी पक्षाबरोबरच सहकारी पक्षानेही प्रयत्न केल्याची चर्चा महाडिक गटातच होती. पेठ निवडणुकीत झालेले पाडापाडीचे राजकारण महाडिक कुटुंबाच्या जिव्हारी लागले आहे. त्यामुळे सम्राट महाडिक यांनी कार्यकर्त्यांच्या मागणीवरून विधानसभा निवडणुकीत उतरण्याचा निश्चय केला आहे. महाडिक परिवाराबरोबर जिव्हाळ्याचे संबंध असणारे खा. नारायण राणे यांच्या माध्यमातून उमेदवारीसाठी हक्क सांगण्यात येऊ शकतो आणि त्यात निश्चित यशस्वी होणार, असा विश्वास महाडिक समर्थकांना आहे.